पतंग उडवताना या गाेष्टींची घ्या काळजी ; महावितरणाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 04:55 PM2019-01-12T16:55:17+5:302019-01-12T16:56:10+5:30
पतंगाेत्सव साजरा करताना पतंग वीजयंत्रणांमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घेण्याचे तसेच वीज वाहिन्यांमध्ये अडकेलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करुन नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
पुणे : मकर संक्रांत अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्याची परंपरा आहे. पतंग उडविताना अनेकदा अपघात हाेतात. त्यामुळे पतंग उडविताना वीजवाहिन्या, रोहित्र, फीडर पिलर आणि वीजयंत्रणेपासून काळजी घेण्याचे आवाहन महावितरणाच्यावतीने करण्यात आले आहे.
मकर संक्रांतीनिमित्त नागरिक माेठ्याप्रमाणावर पतंग उडवत असतात. शहरात महावितरणच्या उच्च आणि लघुदाबाच्या वीज वाहिन्या, रोहित्र तसेच इतर वीजयंत्रणा अस्तित्वात आहेत. अनेकदा पतंग महावितरणाच्या वीज वाहिन्यांमध्ये अडकतात. त्या काढताना वीजेचा झटका बसण्याची शक्यता असते. तसेच राेहित्रकांमध्ये अडकणाऱ्या पतंग काढण्याचा प्रयत्न देखील लहान मुलांकडून हाेत असताे. त्यामुळे वीज वाहिण्या, राेहितके यांच्यापासून पतंग उडवताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे. पतंगाच्या मांज्यामुळे शाॅट सर्किट हाेऊन वीज प्रवाह खंडित हाेण्याची तसेच एखादा अपघात घडण्याची शक्यता असते.
त्यामुळे नागरिकांनी विशेषकरुन लहान मुलांनी गजबजीच्या ठिकाणाऐवजी माेकळ्या मैदानात पतंगाेत्सव साजरा करावा. तसेच पालकांनी लहान मुले पतंग उडवत असताना त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. वीजयंत्रणेमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन सुद्धा महावितरणकडून करण्यात आले आहे.