पुणे : मौजे नाणेकरवाडी ग्रामपंचायतीच्या प्लंबिंग कॉन्ट्रँक्टची उर्वरित बिले देण्यासाठी कामाचा मोबदला म्हणून तक्रारदाराकडून २८ हजार रूपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.भाऊसाहेब पांडुरंग वणवे (वय ५३ नानेकरवाडी चाकण ता. दौंड) असे पकडलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. तक्रारदार यांच्याकडे मौजे नाणेकरवाडी ग्रामपंचायतीचे प्लंबिंगचे कॉट्रक्टचे काम होते. या कॉँन्ट्रॅक्ट अंतर्गत त्यांनी ग्रामपंचायतीची प्लंबिंगची कामे केली होती. तक्रारदार यांनी केलेल्या कामाची काही बिले ग्रामसेवक भाऊसाहेब वणवे यांनी तक्रारदार यांना अदा केली होती व काही बिलांचे धनादेश अदा करणे बाकी होते. ग्रामसेवकाने तक्रारदाराकडे कामाचा मोबदला आणि राहिलेल्या बिलाचा धनादेश देण्यासाठी ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने ग्रामसेवकाविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या तक्रारीची पडताळणी केली असता ग्रामसेवकाने तडजोडीअंती २८ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. विभागाने सापळा रचून ग्रामसेवकाला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर चाकण पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तक्रारदाराकडून २८ हजार रूपयांची लाच घेताना ग्रामसेवकाला रंगेहाथ अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 8:51 PM