‘ती’च्या गणपतीला समाजाने नाकारलेले ‘ते’

By admin | Published: September 26, 2015 02:43 AM2015-09-26T02:43:49+5:302015-09-26T02:43:49+5:30

‘त्यांचे’ अस्तित्वच नाकारलेले... तिरस्कार भरल्या नजरांचा सामना रोजचाच.. सहानुभूतीच्या शद्बांचा दुष्काळ सोसत जगणारे ‘ते’. ‘ती’च्या अंगणात आले.

'Te' denied to society by Ganesha | ‘ती’च्या गणपतीला समाजाने नाकारलेले ‘ते’

‘ती’च्या गणपतीला समाजाने नाकारलेले ‘ते’

Next

पुणे : ‘त्यांचे’ अस्तित्वच नाकारलेले... तिरस्कार भरल्या नजरांचा सामना रोजचाच.. सहानुभूतीच्या शद्बांचा दुष्काळ सोसत जगणारे ‘ते’. ‘ती’च्या अंगणात आले. ‘ती’ च्या हक्काच्या प्रांगणात विराजमान झालेल्या गणरायाची आरती त्यांच्या हस्ते झाली. त्यांच्या दृष्टीने हा इतिहास होता. आपल्यालाही सन्मान आहे, ही जाणीव जागा करणारा अनुभव होता. पुरोगामित्वाच्या भूमिकेला बळ देण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाला आणखी एक पाऊल पुढे नेले.
‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘ती’ च्या गणपतीची आरती तृतीयपंथीय असलेल्या चार जणींच्या हस्ते सन्मानाने बोलावून करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांसोबत त्यांनीही गणरायाच्या आरतीचे ताट हातामध्ये धरले होते. समाज रचनेच्या बेगडी परंपरांना छेद देत, त्यांना मिळालेला सन्मान त्यांच्या डोळ्यांमध्ये दाटला होता आनंदाश्रुंच्या रूपाने. आजवर केवळ नाकारण्यात आलेल्यांना काहीतरी ‘साकारण्यासाठी’ सन्मानाची वागणूक मिळत होती. त्यांच्या अस्तित्वाचा पुरावाच देत होती. मराठी, हिंदी आणि भाषांसोबतच इंग्रजीवरचे त्यांचे प्रभुत्व थक्क करणारे होते.
गणरायाच्या आरतीला आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनाही त्यांच्या इंग्रजीने भुरळ पाडली. या विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. हा अनुभवही त्यांच्यासाठी आशेचा किरण होता. समाजाला त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणारी एक क्रांतिकारी घटना होती. लिंगभेदाच्या तकलादू चौकटी उखडून टाकण्याची ही सुरुवात ‘ती’च्या गणपतीच्या निमित्ताने झाली. त्यांनाही जगण्याचा आणि समाजामध्ये वावरण्याचा हक्क आहे. त्यांच्या हक्काच्या लढाईमध्ये आम्हीही सोबत आहोत, असा विश्वास त्यांना ‘लोकमत’ने दिला. ‘आम्हाला कष्ट करून जगण्याची इच्छा आहे. भीक नको संधी हवी, परिवर्तनाची ही नांदी नवी,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
लोकमतचा ‘ती’चा गणपती ही संकल्पना आम्हाला खूप आवडली आणि या आरतीत आम्हाला मान मिळाला. कारण, समाजामध्ये आम्हाला सन्मानाची वागणूक दिली जात नाही, ती ‘लोकमत’ने आम्हाला मिळवून दिली. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. असेच विविध उपक्रम ‘लोकमत’ने यापुढे राबविले पाहिजे आणि आम्हाला सहभागी करून घेतले पाहिजे.
- अप्पा पुजारी

‘ती’चा गणपती ही खूप आगळी वेगळी संकल्पना आहे, अशीच संकल्पना प्रत्येकाने राबवायला पाहिजे. आम्हाला समाज स्वीकारत नाही, आमचा त्रागा करतो. पण ‘लोकमत’ने आम्हाला आमची वेगळी ओळख निर्माण करून दिली.
- मोनिका दोडके
‘ती’चा गणपती महिलांचा असल्यामुळे महिलांना समाजामध्ये एक प्रकारे आदराची वागणूक दिली जाईल. त्यामुळे प्रत्येक मंडळाने अशी संकल्पना राबवायला हवी. ‘लोकमत’चा खूप चांगला उपक्रम आहे आणि आम्हाला इथे बोलावून, समाजामधील लोकांना एक आदर्श घालून दिला आहे.
- कशिश भालके

‘ती’चा गणपती हा उपक्रम प्रेरणादायी आहे, प्रत्येक ठिकाणी पुरुषांना गणपतीच्या आरतीत मान असतो, हेच आम्ही सगळीकडे पाहतो; पण ‘लोकमत’ने आदर्श निर्माण केलेला आहे. आम्हाला या संकल्पनेत सहभागी करून घेतल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे.
- रिया शेख

Web Title: 'Te' denied to society by Ganesha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.