राज्यातील रेशन दुकानात आता मिळणार चहा पावडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:14 AM2021-08-13T04:14:13+5:302021-08-13T04:14:13+5:30
मिळणार चहा पावडर बारामती : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आता रेशन दुकानात चहा पावडर मिळणार आहे. विविध अन्नधान्याबरोबरच चक्क चहा ...
मिळणार चहा पावडर
बारामती : सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात आता रेशन दुकानात चहा पावडर मिळणार आहे. विविध अन्नधान्याबरोबरच चक्क चहा पावडर मिळणार असल्याने शासनाने सर्वसामान्यांना चहाची तलफ भागविण्याची सोयच जणू केली आहे. याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अवर सचिव गजानन देशमुख यांनी गुरुवारी (दि.१२) शासन निर्णय जाहीर केला आहे.
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड) या बॅन्डअंतर्गत उत्पादित होणाऱ्या उत्पादनाचे वितरण राज्यातील सर्व अधिकृत रास्त भाव शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्याची विनंती केली होती. संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने याबाबत केलेल्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय राज्यातील सर्व अधिकृत रास्त भाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे. सर्वसामान्यांना चहापत्तीचे रास्तभाव किमतीत दर्जेदार उत्पादन मिळावे यासाठी राज्यातील सर्व रास्तभाव दुकानांमध्ये ‘नाफेड’ अंतर्गत चहापत्ती उत्पादन विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. अखेर आज हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘नाफेड’ या बॅं्रड अंतर्गत उत्पादीत होणारी चहापत्तीची उत्पादने राज्यातील सर्व अधिकृत रास्त भाव शिधावाटप दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. संबंधित ब्रँड त्यांच्या वितरकांमार्फत राज्यातील रास्तभाव, शिधावाटप दुकानापर्यंत वितरित करण्यात येणार आहे. तसेच, त्यांच्यामार्फत वितरीत करण्यात येणाऱ्या चहापत्तीच्या उत्पादनावर विक्रीपोटी मिळणाऱ्या कमिशनसाठी संबधित दुकानदारांनी संबंधित योजनेच्या वितरकांसह नाफेडच्या कार्यालयाशी परस्पर संपर्क साधणे आवश्यक आहे. हा व्यवहार नाफेड व संबधित दुकानदार यांच्यामध्ये राहील. यात शासनाचा कोणताही सहभाग अथवा हस्तक्षेप राहणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
———————————————