शिक्षकाने केला तरुणीचा विनयभंग; तरुणीच्या पतीलाही ठार मारण्याची दिली धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 07:32 PM2022-08-25T19:32:29+5:302022-08-25T19:32:37+5:30
खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाला सिंहगड रस्ता पोलिसांनी केली अटक
धायरी : तरुणीचे लग्न ठरल्याने तिने खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकाशी संबंध न ठेवण्यास सांगितले. तेव्हा त्याने तिच्याबरोबरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन नियोजित पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सिंहगड रस्ता पोलिसांनी नितीश सुडके ऊर्फ हर्षवर्धन लक्ष्मण पाटील (वय २८, रा. हिंगणे, सिंहगड रस्ता,पुणे) याला अटक केली आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार जून २०२२ पासून सुरु होता.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीश हा एका खासगी क्लासेसमध्ये गणित विषय शिकवत. यावेळी तक्रारदार तरुणीनेही त्याच्याकडे गणित विषयासाठी क्लास लावला होता. दरम्यान आरोपी शिक्षक व तरुणी यांच्यात २०२० मध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, तक्रारदार तरुणीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरविल्याने तिने नितीश याला संबंध न ठेवण्यास सांगितले.तरीही तो तिला वारंवार भेटून तक्रारदार तरुणीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत असे, त्याचबरोबर वारंवार तरुणीचा पाठलाग करीत असे. ज्या मुलासोबत फिर्यादीचे लग्न जमले आहे, त्या मुलाला आरोपीने फोन करून जीवे ठार मारण्याची धमकीही दिली असल्याने त्याच्यावर सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लोहार करीत आहेत.