शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये बंधुतेचा विचार रुजवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:57+5:302020-12-14T04:26:57+5:30
प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया : विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. डॉ. ...
प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया : विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेतील स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या मूल्यांतील बंधुतेचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवा. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व महाराष्ट्र विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी झाले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, संमेलनाध्यक्ष प्राचार्य प्रा. प्रदीप कदम, स्वागताध्यक्ष अनिल पाटील, कवी चंद्रकांत वानखेडे, माजी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, माजी स्वागताध्यक्ष डॉ. विजय ताम्हाणे, प्रकाश जवळकर, संयोजक महेंद्र भारती, प्रा. वैभव पताळे, प्रा. प्रशांत रोकडे, शंकर आथरे उपस्थित होते. याप्रसंगी ‘बंधुतेचे विस्तीर्ण क्षितिज्’ पुस्तकाचे प्रकाशन व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
प्रकाश रोकडे म्हणाले, कोरोनाच्या साथीनंतर सगळी क्षेत्रे सुरू झाली. मात्र, अद्यापही ज्ञानमंदिरे बंद आहेत. शिक्षणसंस्था, शिक्षक आणि पालकांनी मनातील अनावश्यक भीती काढून टाकावी आणि संहिता पाळून शाळा सुरू करण्यात पुढाकार घ्यावा. शिक्षकांनी अद्ययावत ज्ञान आत्मसात करत विद्यार्थ्यांना नव्या युगाचे शिक्षण देण्यावर आपण भर दिला पाहिजे.
अनिल पाटील यांनी प्रास्ताविक तर शंकर आथरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत रोकडे व महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. प्रा. अमोल कवडे यांनी आभार मानले.