सांग सांग भोलानाथ..खेड पंचायत समितीच्या इमारतीचे काम कधी सुरू होणार? पुण्यात शिवसेनेचे'जागरण गोंधळ'आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 02:30 PM2020-09-18T14:30:32+5:302020-09-18T14:31:22+5:30
पुण्याची जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे.हे वेळीच थांबवा. एखाद्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणे अधिकाऱ्यांना शोभत नाही..
पुणे: सांग सांग भोलानाथ.. खेड पंचायत समितीच्या इमारतीचे काम कधी सुरू होणार? प्रशासनाला जाग कधी येणार? असा प्रश्न नंदी बैलाला विचारत, जवाब दो.. जवाब दो आयुष प्रसाद ..जवाब दो,जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा धिक्कार असो यांसारख्या जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेसमोर शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने 'जागरण गोंधळ' आंदोलन करण्यात आले.
खेड तालुका पंचायत समितीच्या कामाला चार कोटी रुपयांचा निधी मिळाला असून या कामाला मंजुरी मिळाली, भूमिपूजन झाले, कामाची वर्क ऑर्डर निघून सहा महिने उलटूनही काम सुरू करण्याचे आदेश न दिल्याने शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर गोधळ घालत आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार तसेच शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख माऊली कटके, उपजिल्हा प्रमुख सुनील बानखिले, शिवसेनेचे गटनेते आणि जिल्हा परिषद सदस्य देविदास दरेकर, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, बाबाजी काळे, तनुजा घनवट, शालाखा कोंडे, ज्योती झेंडे, रुपाली कड, शैलजा खंडागळे, उपसभापती ज्योती अरगडे , सिधुताई शिंदे, भगवान पोखरकर, सुभद्रा शिंदे, मच्छिद्र गावडे, अमर कांबळे, सुरेश चव्हाण, किरण गवारी, विशाल पोटले, बापू थिटे, राहुल मलगे, केशव अरगडे, संतोष अरगडे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले.मात्र, काम लवकर सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, खेड पंचायत समिती इमारतीचे शिवसेनेच्या तत्कालीन खासदार- आमदार यांनी मंजूर केलेले काम होऊ द्यायचे नाही या राजकीय हेतूने विरोध केला जात आहे. पालकमंत्र्यांना भेटलो. तेव्हा लक्षात आले की, खेडच्या विद्यमान आमदारांनी त्यांना चुकीची माहिती दिली. मग मी त्यांना कामाची वर्कऑर्डर झालेली आहे,भूमिपूजन झाले आहे,बांधकाम परवाना मिळाला आहेत असे सर्व काही सांगितले. त्यावर अजित पवार म्हणाले, आपण एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सहा महिने झाले. त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण विकास मंत्री यांचे पत्र आल्यावर काम सुरू करू असे सांगितल्याप्रमाणे ग्रामविकास मंत्र्यांचे पत्र आणले.आयुष प्रसाद हे तिकडे गोड बोलतात.आणि इकडे ही गोड बोलतात.मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आहे. परंतु शिवसेनेचे खच्चीकरण होत असेल तर या पुढील काळातही रस्त्यावर उतरावे लागेल. पुण्याची जिल्हा परिषद राजकारणाचा अड्डा बनला आहे.हे वेळीच थांबवा. एखाद्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणे अधिकाऱ्यांना शोभत नाही. हे आंदोलन म्हणजे फक्त इशारा आहे. खोटे आदेश काढण्याचे काम अधून मधून चालते. चांगलं आरोग्य, चांगले शिक्षण ,विकास कामे झाली पाहिजेत. परंतु राजकारणा चढाओढ सुरू आहे, असेही आढळराव पाटील यांनी यावेळी सांगितले