मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याची बतावणी करून पंचतारांकित हॉटेलची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 08:46 PM2018-10-07T20:46:03+5:302018-10-07T20:48:07+5:30
मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याचे सांगत एकाने पुण्यातील पंचतारांकित हाॅटेलची फसवणूक केली अाहे.
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव असल्याचे खोटे सांगून पुण्यातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलची फसवणुक केल्याप्रकरणी पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने मुंबईतील एका प्रसिध्द उद्योजकाला अटक केली आहे. आदित्य अशोक जोगानी (वय ३९, रा. तहानी हाईट्स, नेपीसी रोड, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी सचिन डिडोळकर (वय ३६, रा़ खराडी) यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिडोळकर हे पुण्यातील मंगलदास रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये व्यावसायिक संचालक पदावर कार्यरत आहेत. आरोपीने मुख्यमंत्र्यांचा अतिरिक्त मुख्य सचिव असल्याची खोटी बतावणी करत जानेवारी २०१८ ते आत्तापर्यंत पंचतारांकित हॉटेलशी ई-मेलद्वारे संपर्क साधला आणि त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर हॉटेलच्या रिसेप्शनशी स्वत: अॅडिशनल चीफ सेक्रेटरी नसताना प्रविणसिंह परदेशी यांच्या नावाचा गैर फायदा घेऊन सचिन डिडोळकर यांच्याशी संपर्क साधून स्वत:च्या व मानव शहा, नवी शहा, गीता शहा अशी नावे सांगणाऱ्या व एका महिलेच्या राहण्याची आणि जेवणाची सोय हॉटेलमध्ये करुन घेतली़. तसेच व्हीआयपी सर्व्हिस उपभोगून हॉटेलचे ९५ हजार ९०० रुपयांचे बिल केले. विशेष म्हणजे निघून जाताना त्यांनी हॉटेलचे ओपिनियन रजिस्टरमध्ये स्वत:चा अभिप्रायही लिहिला होता़ हे बिल देण्यासाठी डिडोळकर यांनी वारंवार संपर्क साधल्यानंतरही टाळाटाळ केली़ पैसे न देता फसवणूक केली.
याप्रकरणी फियार्दींनी पोलिसांत धाव घेतल्यावर प्रकरणाचा संपुर्ण तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक लक्ष्मण डेंगळे, महिला सहाय्यक निरीक्षक व्ही.एस. चव्हाण आणि त्यांच्या पथकाने आदित्य जोगानी याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. आदित्य जोगानी याने यापूर्वी देखील परेदशी डायमंड कंपनी तसेच मुंबई दोन ठिकाणी फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून पुरावा म्हणून दिलेले वाहनचालक परवाना जप्त करायचा असल्याने त्याला पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली़ न्यायालयाने त्याला १० आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक व्ही.एस. चव्हाण करीत आहेत.