पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळामधील विविध खातेप्रमुखांच्या मंगळवारी (दि. २९) बदल्या करण्यात आल्या. पण या बदल्यानंतरही पीएमपीमध्ये प्रभारी ‘राज’ कायम राहिले आहे. बहुतेक अधिकाऱ्यांना नवीन पदावर प्रभारी म्हणूनच नियुक्ती देण्यात आली आहे. पुर्वीप्रमाणेच लिपिक व प्रशासनातील अधिकाऱ्यांना तांत्रिक पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे.पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी मंगळवारी बदल्यांचे आदेश काढले. एकुण १३ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. प्रभारी वाहतुक व्यवस्थापक यांना पुर्वीचा बीआरटी विभागाचा प्रभारी पदभार देण्यात आला. तर बीआरटीचे विभागप्रमुख सुनिल गवळी यांना पुणे महापालिकेत मेट्रोचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. नतवाडी आगारेच व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे प्रभारी वाहतुक व्यवस्थापक असतील. कोथरुड आगाराचे व्यवस्थापक चंद्रकांत वरपे यांना वाहतुक नियोजन व संचलन अधिकारी, पुणे स्टेशनचे प्रभारी व्वस्थापक राजेश कुदळे यांना कोथरुडचा पदभार, मार्केटयार्डचे संजय कुसाळकर यांना पुणे स्टेशन आगार, प्रभारी वरिष्ठ लिपिक बापू मोरे यांना मार्केटयार्ड आगार व्यवस्थापकपदी नियुक्ती देण्यात आली.प्रशासन प्रमुख सुभाष गायकवाड यांच्या जागी नितीन घोगरे यांची बदली करण्यात आली. घोगरे हे कात्रजचे आगार व्यवस्थापक होते. जनता संपर्क अधिकारी म्हणून सतीश गाटे हे काम पाहणार आहेत. तसेच विजय रांजणे, नारायण करडे, सोमनाथ वाघोले व शिरीष कालेकर यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पीएमपीमध्ये जवळपास ७० टक्के पदांवर प्रभारी अधिकारी काम पाहत आहेत. या बदल्यानंतरही हे चित्र कायम राहणार आहे.-----------
पीएमपीमध्ये पुन्हा प्रभारी ‘राज’ कायम ; एकूण १३ जणांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 2:23 PM