पिरंगुट: मुळशी तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी तालुक्यातील अकरा गावांमध्ये दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय नुकताच पिरंगुट येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे.
यामध्ये १५ ते २५ मे असा या लॉकडाऊनचा कार्यकाळ असून तालुक्यातील पिरंगुट, कासारआंबोली, उरवडे घोटावडे, भरे, अंबडवेट, लवळे, नांदे, भुगाव, भुकुम व पौड या अकरा गावांमध्ये आजपासून दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन असणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहे.
पिरंगुट येथे वरील अकरा गावातील लोकप्रतिनिधींसह मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण, पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच बैठक झाली. यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण म्हणाले, मुळशीत पहिल्या लॉकडाऊन पासून चांगली जनजागृती झालेली आहे. मात्र दुसऱ्या लाटेत कुटुंबच्या कुटुंब कोरोनाबाधित होऊ लागली आहेत. तर प्रशासनाला सुध्दा काम करताना काही मर्यादा येत आहेत. कामगारवर्ग जास्त असणाऱ्या ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच कामाशिवाय कोणत्याही नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून तो नियंत्रणात आणण्यासाठी तालुक्यातील मोठ्या अकरा गावांमध्ये दहा दिवसासाठी कडक लॉकडाऊन करण्याचा हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला आहे.