हॉटेल मालकाकडे मागितली १० लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 01:52 AM2018-10-27T01:52:35+5:302018-10-27T01:52:41+5:30
तर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू, असे पांचाली हॉटेलच्या मालकाला धमकावल्याप्रकरणी फोन करून क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आलेल्याला पकडले आहे. तुम्ही जर तातडीने १० लाख रुपये दिले नाही, तर तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करू, असे पांचाली हॉटेलच्या मालकाला धमकावल्याप्रकरणी फोन करून क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल वामन भिडे (वय ५५, रा. जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे जंगली महाराज रस्त्यावर पांचाली नावाचे हॉटेल असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे यांनी दिली. या संदर्भात सविस्तर असे : फिर्यादीला बुधवारी रात्री बाराच्या सुमारास एका मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता.
कॉल करणाºयाने मुंबई क्राईम ब्रँचचा अधिकारी असल्याचे सांगितले. ‘मुंबई येथे एका व्यक्तीला पिस्तुल खरेदी करताना पकडले आहे. त्याने तुमच्यासाठी पिस्तुल खरेदी करायला आल्याचे सांगितले आहे. गुन्हा दाखल करायचा नसेल तर
तुम्ही १० लाख रुपये द्या; अन्यथा
गुन्हा दाखल करून माध्यमांद्वारे बदनामी करण्यात येईल,’ असे त्याने धमकावले. त्यामुळे भिडे
यांनी शिवाजीनगर पोलिसांत
फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे करीत आहेत.
असा घडतो गुन्हा
ज्याच्याकडे खंडणी मागायाची आहे, तो कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहातो, याचा अभ्यास तोतया अधिकारी करतो. त्यानंतर संबंधित पोलीस ठाण्याला फोन करून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव विचारून घेतो. यानंतर रात्री १२ ते पहाटे ४ दरम्यानच संबंधित पोलीस ठाण्यात कॉल करून, ठाणे अंमलदाराला तुमच्या वरिष्ठ पोलीस अधिकाºयाशी बोलणे झाल्याचे भासवतो.
ज्याच्याकडे खंडणी मागायाची आहे, त्याला पोलीस ठाण्याला बोलावून घेण्यास सांगितले जाते. इतक्या रात्री पोलिसांनी बोलावले असल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्ती घाबरून गेलेली असते. ही व्यक्ती पोलीस ठाण्यात हजर होताच, तिच्या मोबाइलवर फोन करून सेटलमेंटसाठी दबाव टाकला जातो. संबंधित व्यक्ती सेटलेमेंटला तयार झाल्यास तिला मुंबईला पैसे घेऊन बोलावले जाते.
यापूर्वीदेखील घडला असा प्रकार
या प्रकारचा आणखी एक गुन्हा एका पेट्रोल पंपचालकाबाबत घडला होता. त्यालाही अशाच प्रकारे धमकावून पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले होते. मात्र, संबंधित पेट्रोल पंपचालकाने तक्रार दाखल केली नाही. या गुन्ह्यातही तोच प्रकार झाला आहे.