लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खुनी हल्ला करून फरार झालेल्या आरोपीस तब्बल १० वर्षांनी पकडण्यात दत्तवाडी पोलिसांना यश मिळाले. मित्राच्या बहिणीची चेष्टामस्करी केल्याच्या कारणावरून चिडून जाऊन एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आरोपीने केला होता. तेव्हापासून हा आरोपी फरार होता.
अभिषेक ऊर्फ गुड्डू जगन्नाथ भालेराव (वय २९, रा. सर्वे क्र.१३३, बावन्न चाळ, इंदिरानगर, पर्वती पायथा) असे अटक केलेल्या फरारी आरोपीचे नाव आहे. दत्तवाडी पोलीस स्टेशनचे तपास पथक पोलीस ठाण्याच्या हददीतील पाहिजे व फरारी रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करीत असताना पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर आणि राहुल ओलेकर यांना एक फरारी आरोपी नीलायम टॉकीज जवळील प्लॅटिनम हॉटेलजवळील बोळात रस्त्यावर उभा असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून त्याला बोळात पकडले. त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दि. १० मे २०११ रोजी त्याने व त्याचे मित्र विशाल गायकवाड, पिंटू भालेराव, योगेश शिंगाडे आणि इतर सहा ते सात जणांनी मिळून त्यांच्या मित्राच्या बहिणीची चेष्टामस्करी केल्याच्या कारणावरून चिडून जाऊन गणेश मळा या ठिकाणी व वसंत कांबळे याच्या तोंडावर आणि डोक्यात कोयता घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आरोपी पळून गेला होता.
त्याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मात्र तेव्हापासून हा आरोपी फरार आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहून तो पोलिसांना गुंगारा देत होता. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोहार करीत आहेत. ही कामगिरी तपास पथकातील पोलीस हवालदार सुधीर घोटकुले, कुंदन शिंदे, राजू जाधव, महेश गाढवे, पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर आणि राहुल ओलेकर, शरद राऊत, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे, अमित सुर्वे आणि विष्णु सुतार यांनी केली आहे.