लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुळा-मुठा नदीसुधार कार्यक्रमांतर्गत नियोजित सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेतर्फे काढण्यात येणाऱ्या निविदांमधील अटी-शर्ती जपानच्या जायका कंपनीने मान्य केल्या आहेत.
या मान्यतेमुळे गेली कित्येक महिने रखडून राहिलेली निविदा प्रकिया येत्या महिनाभरात मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नदीसुधार कार्यक्रमांतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सुमारे बाराशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी जपान येथील जायका कंपनीने साडेआठशे कोटी रुपयांचे अर्थसहाय्य महापालिकेला केले आहे.
परंतु, सन २०१६ पासूनच या प्रकल्पाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. कधी प्रकल्पाच्या निविदा योग्य नाही, तर ठेकेदार तथा सल्लागार कंपनी आदी समस्यांमुळे व प्रकल्पासाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमधील अटीशर्ती विविध कारणास्तव वादग्रस्त ठरल्या. परिणामी महापालिका प्रशासनाने पुन्हा विकास आरखड्यात तसेच निविदांच्या अटी-शर्तीमध्ये सुधारणा केल्या असून, या कामासाठी इच्छुक कंपन्यांनी केलेल्या सूचनांचाही निविदांमध्ये समावेश केला. या सुधारित निविदा अंतिम मान्यतेसाठी जायका कंपनीकडे पाठवल्या होत्या, त्यास मंगळवारी मान्यता देण्यात आली.
जायकाने दिलेल्या तत्वतः मान्यतेसह सर्व अटी-शर्ती आज निविदेसोबत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत. पुढील चार आठवडे निविदा भरण्याची मुदत असून, त्यानंतर आलेल्या निविदा व पुढील प्रक्रिया मान्य केल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
चौकट
“नदीसुधार प्रकल्पासाठीच्या निविदा प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले आहेत. जायका कंपनीच्या नियमानुसारच सर्व पूर्तता करण्याची तांत्रिक प्रक्रिया पार पाडावी लागली असून, ती आज पूर्ण झाल्याने निविदा प्रक्रिया अधिक वेगाने होईल. त्यामुळे प्रकल्पाचे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहिल.”
मुरलीधर मोहोळ, महापौर