होरवस्तीत बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:02+5:302021-07-16T04:09:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क दावडी : होरेवस्ती (ता. खेड) येथे बिबट्यांच्या हल्ल्यात घोडी मृत्युमुखी पडली आहे. दावडी परिसरात पाळीव प्राण्यांवर ...

The terror of leopards in Horvasti | होरवस्तीत बिबट्याची दहशत

होरवस्तीत बिबट्याची दहशत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

दावडी : होरेवस्ती (ता. खेड) येथे बिबट्यांच्या हल्ल्यात घोडी मृत्युमुखी पडली आहे. दावडी परिसरात पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले होत असून ग्रामस्थांना अनेक वेळा वन खात्याला पिंजराला लावण्याची मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे. एखाद्या माणसाचा जीव गेल्यावर पिंजरा लावणार का, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला.

दावडी गावांना अनेक वाड्यावस्त्या जोडल्या आहेत. पडीक जमीन शेतकऱ्यांनी शेतीसाठी उघडल्या आहेत. यामुळे येथील उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यामुळे बिबट्याचा वावरही या ठिकाणी वाढला आहे. होरेवस्ती, खेसेवस्ती, डुंबरेवस्ती या परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. मागील वर्षी धनगराच्या मेंढ्यावर हल्ला करून ४ मेंढ्या ठार केल्या होत्या. गेल्या महिन्यात संतोष डुले या मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून एक मेढी फस्त करून दोन मेंढ्या जखमी केल्या होत्या. तसेच दोन दिवसांपूर्वी होरेवस्ती येथे गोटीराम नाथा कोळेकर या मेंढपाळाच्या घोडीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात घोडी जागीच मृत झाली.

गेल्या काही महिन्यात बिबट्याचे हल्ले पाळीव प्राण्यांवर होत असून अनेक पाळीव प्राणी या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर व उपद्रवामुळे येथील नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करावा. यासाठी येथे पिंजरा लावावा, अशी मागणी वन विभागाला ग्रामपंचायत तसेच शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, वनविभाग याकडे दुर्लक्ष करून उलट ग्रामस्थांनाच विचारत आहे. या ठिकाणी खरंच बिबट्या आहे काय? असेल तर त्यांचे फोटो पाठवा, पायाचे ठशाचे फोटो दाखवा तरच आम्ही पिंजरा लावू, अशी उत्तरे मिळत असल्याचे दावडीचे उपसरपंच राहुल कदम

माजी सरपंच हिरामण खेसे, राणी डुंबरे, संतोष सातपुते व ग्रामस्थांनी सांगितले.

कोट

दावडी परिसरात बिबट्याचे हल्ले पाळीव प्राण्यांवर होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. वनविभागाला या ठिकाणी पिंजरा लाववा, असे वारंवार लेखी पत्रव्यवहार व सांगूनही वन खाते दुर्लक्ष करत आहे. उलट वन खाते सांगते बिबट्याचे फोटो काढा. म्हणजे जीव धोक्यात घालून बिबट्याचे फोटो काढायचे का?

- संभाजी घारे, सरपंच, दावडी

कोट

दावडी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या परिसरात वनकर्मचारी जाऊन आले आहेत. आमचे वरिष्ठ येणार असल्याने दोन दिवस कामात व्यस्त आहोत. दोन दिवसांनी या ठिकाणी पिंजरा लावणार आहे.

- दत्तात्रय फाफाळे, वनपाल, राजगुरुनगर विभाग

Web Title: The terror of leopards in Horvasti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.