पुणे : महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या राज्यशास्त्र पुस्तकात भाजपा, शिवसनेचे गुणगान करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सत्ताधारी पक्षांचे गुणगान गाऊन विरोधी पक्षांची प्रतिमा करण्याच्या हा प्रयत्न आहे, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटले आहे.तर सर्व राष्ट्रीय राजकीय पक्ष व विभागवार प्रादेशिक पक्ष यांची अधिकृत भूमिका मांडल्याचे राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत परांजपे यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे.‘भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असून प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर पक्षाचा भर आहे,’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तर ‘शिवसेना हा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यास झाली आहे.’ या उल्लेखांवर आक्षेप घेण्यात आला आहे.यावर परांजपे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दिलेल्या यादीनुसार सर्वच राष्टÑीय पक्ष व विभागवार प्रमुख प्रादेशिक पक्षांची माहिती पुस्तकामध्ये दिली आहे. राष्टÑीय पक्षांच्या स्थापना दिनांकानुसार सर्व राष्टÑीय पक्ष व त्यांच्या भूमिकांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.।भाजपा सरकारने जाहिरातबाजीसाठी पाठ्यपुस्तकांचाही गैरवापर सुरू केल्याचे स्पष्ट होते. गुणगान करण्यासारखी भाजपाची कोणतीही कामगिरी नाही. त्यांचा ना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे, ना स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या उभारणीत योगदान आहे. हा मजकूर तातडीने वगळावा.- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा
दहावी राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकात भाजपा, शिवसेनेचे गुणगान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 6:04 AM