सणसवाडीत थर्माकॉल कारखान्याला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 04:40 PM2018-04-03T16:40:58+5:302018-04-03T16:40:58+5:30
सणसवाडी येथील थर्माकॉल बनविणा-या थर्मो प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या घटनेत जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोरेगाव भीमा : सणसवाडी येथील थर्माकॉल बनविणा-या थर्मो प्रॉडक्टस प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याला मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कारखान्याचे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. या घटनेत जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवारी या कारखान्याला अचानक आग लागली. आगीची दाहकता इतकी प्रचंड होती की काही क्षणात कारखान्याच्या संपूर्ण गोडाऊनचा काही क्षणात ताबा घेतला. आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरू लागले. शेजारी असलेल्या हर्षओगल कारखान्यातील शशिकांत पवार यांनी तत्काळ आपल्या कारखान्यातील कामगारांना बोलावले. तसेच पवार यांनी प्रसंगावधान दाखवून कंपनीतील पाण्याच्या पाईपच्या साहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र, थर्माकॉल लगेच पेट घेत असल्याने व पॅकिंगसाठी आवश्यक असलेल्या पुठ्ठेही त्याठिकाणी असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. या आगीचे लोळ सणसवाडी, कोरेगाव भीमापर्यंत दिसत होते. सणसवाडीचे सरपंच रमेश सातपुते, पोलीस पाटील दत्तात्रय माने,पोलीस हवालदार बाळासाहेब थिकोळे, योगेश नागरगोजे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील दोन अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.त्यांनी प्रथम वनविभागाच्या जागेमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणून नंतर कंपनीतील आग विझवली. दरम्यान, पुणे महानगरपालिकेचा देखील एक अग्निशमक बंब त्या ठिकाणी दाखल झाला. गावातून पाण्याचे टँकर उपलब्ध करून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुमारे एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली.
यावेळी शेजारी असलेल्या वनविभागाच्या जागेमध्ये देखील आगीच्या ठिणग्या उडाल्याने वनविभागाच्या जागेमध्ये देखील आग पसरू लागली. आणि तीन अग्निशामक दलाच्या साह्याने आग पूर्णपणे विझाविण्यात आली. परंतु,तोपर्यंत कंपनीचे संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले होते.
..................
सणसवाडी औद्यागिक क्षेत्रात अग्निशमक यंत्रणेचा अभाव
पुणे नगर महामार्गावर वाघोली, कोरेगाव भीमा, सणसवाडी व शिक्रापूर याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढली आहे. मात्र, कारखान्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजना करण्यासाठी कारखानदार उदासीन असल्याचे पुन्हा एकदा चित्र पाहण्यास मिळाले. ग्रामपंचायत आणि कारखानदार अशा दोघांनी हा अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना निर्मितीसाठी प्रयत्न केला पाहिजे. रमेश सातपुते, सरपंच