देशात धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही; पुण्यात PM मोदींकडून काँग्रेस लक्ष्य
By राजू इनामदार | Published: April 29, 2024 08:25 PM2024-04-29T20:25:11+5:302024-04-29T20:29:35+5:30
जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ व शिरूर या ४ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी रेसकोर्स मैदानावर सोमवारी सायंकाळी मोदी यांची प्रचारसभा झाली....
पुणे : काँग्रेसलाच धर्मावर आधारीत आरक्षण द्यायचे आहे, कर्नाटकमध्ये त्यांनी तेच केले अशी घणाघाती टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील प्रचारसभेत काँग्रेसला लक्ष्य केले. महाराष्ट्रातील एका नेत्याने ३५ वर्षांपूर्वी राज्य अस्थिर केले असा आरोप करत त्यांनी थेट नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. धर्माच्या नावावर आरक्षण देऊ देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ व शिरूर या ४ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी रेसकोर्स मैदानावर सोमवारी सायंकाळी मोदी यांची प्रचारसभा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसेच मुरलीधऱ् मोहोळ, सुनेत्रा पवार, शिवाजीराव आढळराव व श्रीरंग बारणे हे चारही उमेदवार यावेळी उपस्थित होते. पाऊण तासाच्या भाषणात मोदी यांनी काँग्रेसलाच प्रमुख लक्ष्य करत त्यांच्यावर हल्ला चढवला.
जे ६० वर्षात जमले नाही ते आम्ही १० वर्षात केले -
ते म्हणाले,“संविधानाचा खरा अपमान काँग्रेसच करत आहे. कर्नाटकात त्यांनी एका रात्रीत सर्व मुस्लिमांना ओबीसी केले. त्यामुळे मुळ ओबीसींच्या आरक्षणावर टाच आली. संविधानात कुठेही धर्माच्या आधारावर आरक्षण द्या असे म्हटेलेले नाही.”काँग्रेसने ६० वर्षात जे केले नाही ते मागील १० वर्षात आम्ही केले असा दावा करून मोदी म्हणाले, “आम्ही देश आत्मनिर्भर केला. देश आता जगातील दुसऱ्या क्रमाकांचा निर्यातदार देश आहे. संरक्षण साधनांच्या उत्पादनात आपण आत्मनिर्भर झालो. त्यांना साध्या मुलभूत सुविधाही देता आल्या नाहीत, मागील १० वर्षात देशात सव्वालाख स्टार्टअप सुरू झाले. इंग्रजांनी केलेले कायदे आहे तसेच सुरू होते, ते आम्ही बदलले.
भाषणाची सुरूवात मराठीतून -
मागील १० वर्षांच्या आमच्या कार्यकाळात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही. देश विकासाच्या वाटेवर वेगात चालला आहे.“ ७० वर्षांवरील सर्व व्यक्तींचे वैद्यकीय उपचार विनामुल्य केले जातील असे त्यांनी सांगितले. भटकती आत्मा अशी संभावना करून मोदी म्हणाले,“महाराष्ट्रातील एका नेत्याने ३५ वर्षांपूर्वी राज्यात सत्ताबदल केला. तेव्हापासून राज्यात एकही मुख्यमंत्री आपला कार्यकाल पूर्व करू शकला नाही. याच नेत्याने सन १९९५ लाही युतीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप मोदी यांनी केला. त्यांनी शरद पवार यांचे नाव घेतले नाही, मात्र रोख त्यांच्याकडेच होता.” मोदी यांनी भाषणाची सुरूवात मराठीमधून केली. त्यांचा शिंदेशाही पगडी घालून मोहोळ यांनी सत्कार केला.
व्यासपीठावर बसले असताना ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बराच वेळ गुफ्तगू करत होते. सभेला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, तसेच भाजपचे राज्य तसेच स्थानिक पदाधिकारीही व्यासपीठावर उपस्थित होते.