Video: "राजीनाम्याचा विषय संपला आता कामाला सुरुवात", शरद पवारांचे बारामतीत जोरदार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 03:56 PM2023-05-06T15:56:24+5:302023-05-06T16:04:14+5:30
देशका नेता कै सा हो,पवारसाहेब जैसा हो. पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या घोषणांनी परिसर दुमदुमला
बारामती : गेल्या काही दिवसांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासंदर्भातील घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे बारामतीत आगमन झाले. यावेळी माळेगांव येथील गोविंदबाग निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांचे जंगी स्वागत केले. यावेळी मोठी गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयाने शहरात पक्ष पदाधिकाऱ्यांसह नागरिकांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, शुक्रवारी(दि ५) निवृत्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर बारामतीकर सुखावले.
कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आताषबाजी करुन,पेढे वाटुन आनंद व्यक्त केला. निर्णय मागे घेतल्याच्या दुसºयाच दिवशी पवार बारामतीत परतले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पवार यांचे जोरदार स्वागत केले.पवार येणार असल्याची माहिती सर्वांना सकाळीच समजली होती. त्यामुळे सकाळपासुनच गोविंदबागेच्या प्रवेशद्वारावर सर्वांनी गर्दी केली होती. पवार यांचे आगमन होताच सर्वांनी त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. देशका नेता कै सा हो,पवारसाहेब जैसा हो. पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या घोषणांनी परीसर दणाणला. जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते,उद्योजक रविआबा काळे यांनी शाल आणि खास पवार यांच्यासाठी बनविलेला गुलाबांचा पुष्पहार घालुन जोरदार स्वागत केले.माळेगांव कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी यावेळी पवार यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
शरद पवारांचे बारामतीत जोरदार स्वागत #Pune#sharad_pawarpic.twitter.com/JUIC7JxZTw
— Lokmat (@lokmat) May 6, 2023
दरम्यान, गोविंदबागेतून बाहेर पडताना पवार यांनी माध्यम प्रतिनिधींना पाहुन त्यांचा ताफा थांबवला. यावेळी त्यांनी माध्यमाबरोबर मोजुन १३ सेकंद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संवाद साधला. पत्रकारांशी राजीनाम्याच्या विषयावर पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर राजीनाम्याचा विषय संपला. आता कामाला सुरवात करु, असे सांगत त्यांनी एका वाक्यात विषय संपविला.