The Kashmir Files: पुणे तिथं 20 % बिल उणे; 'द काश्मीर फाईल्स' सिनेमाच्या तिकिटावर पुणेरी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:50 PM2022-03-14T19:50:24+5:302022-03-14T19:52:44+5:30
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
पुणे - द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद आणि चर्चा होत आहे. या चित्रपटाच्या समर्थनार्थ आणि विरोधात गटबाजी दिसून येते. विशेष म्हणजे काही राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री ठेवला असून महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. तर, अनेकजण या चित्रपटाचे प्रमोशनसाठी भन्नाट डोकंही लढवत आहेत. पुण्यातील एका हॉटेलमध्ये या चित्रपटाचे तिकीट दाखवा अन् बिलात 20 टक्के सवलत मिळवा अशी पाटी झळकली आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित बनलेली ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने प्रेक्षक चित्रपटगृहात हजेरी लावत आहेत. हरियाणासह काही राज्यांनी या चित्रपटावरील टॅक्स माफ केला आहे. तर, मध्य प्रदेशमध्ये पोलिसांना हा चित्रपट पाहण्यासाठी एक दिवसांची सुट्टी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात यावा, अशी मागणी भाजपने विधानसभेत केली आहे.
आता पुण्यातील एक पाटी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. देशप्रेमींसाठी डिस्काऊंट द काश्मीर फाईल्स सिनेमा... असा आशय या डिजिटल फलकावर झळकला आहे. सिनेमा पाहिल्याचे तिकीट जमा करा आणि जेवणाच्या बिलावर 20 टक्के सवलत घ्या... असी सूट पाषाणच्या बालाजी चौकातील एका हॉटेलने दिली आहे. नाना गरुड असं या हॉटेलचालकाचं नाव असून वंद मातरम... असंही त्यांनी पाटीवर लिहिलं आहे. सध्या, ही पुणेरी पाटी चांगलीच व्हायरल होत आहे.
हा चित्रपट टॅक्स फ्री करावा - नितेश राणे
जम्मू-काश्मीरमध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचे चित्रण करणारा द काश्मीर फाइल्स हा चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा. ज्यामुळे जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर मुस्लीम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले याचे योग्य आणि खरे चित्रिकरण प्रथमच एखाद्या चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेला पाहता येईल. द काश्मीर फाइल्स हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेने अधिकाधिक पाहता यावा याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर टॅक्स फ्री करावा, ही विनंती, असे पत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.