पुणे : सदाशिव पेठेतील थरारक घटना पाहून अंगावर काटाच येतोय. तरुणी प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देत असताना शंतनू जाधव या माथेफिरूने तिचा पाठलाग करून कोयत्याने वार करून संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने शहरात सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या घटनास्थळी तरुणीला वाचवण्यासाठी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील हे दोघे हिम्मत दाखवत पुढे आले आणि माथेफिरू तरुणाला पकडले. लेशपालने या थरारक घटनेत शंतनूच्या हातातील कोयता एका हाताने धरून त्याच्या बॅग फेकण्याचे धाडस केले. या धाडसाचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीसुद्धा या दोन्ही तरुणांचं मी कौतुक आणि अभिनंदन केलं आहे.
दोन्ही तरुणांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो
''पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी मोठ्या शिताफीनं धैर्य दाखवून एका तरुणीचा जीवघेण्या हल्ल्यातून जीव वाचवला, माणुसकी जिवंत असल्याचा वस्तुपाठ जगाला दाखवून दिला. अशा काही तरुणांमुळे पुण्यात सौहार्दयाचं वातावरण आणि पुण्याची संस्कृती टिकून आहे. या दोन्ही तरुणांचं मी कौतुक आणि अभिनंदन करतो'', अशी फेसबुक पोस्ट अजित पवारांनी केली आहे.
लेशपाल हा आडेगाव माढा येथील रहिवासी आहे. मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे. मागील ४ वर्षांपासून तो पुण्यात आला आहे. स्पर्धा परिक्षा देण्यासाठी म्हणूनच तो पुण्यात आला. पर्वती पायथ्याला राहतो. अभ्यासिकेत बसण्यासाठी नवी पेठेत येतो. गावी शेती आहे. त्यादिवशी सदाशिवपेठेतून तो चालला होता. त्याच्यासमोरच मुलगी पळते आहे व तिच्यामागे कोयता घेऊन एक मुलगा धावतो आहे असा प्रसंग घडला. त्याने लगेचच पुढे धाव घेत त्या मुलाच्या हातातील कोयत्यासह त्याला धरले. त्यानंतर काही मुले धावत आली व त्यांनीही त्या मुलाला जेरबंद केले. दिल्लीत एका मुलीची हत्या होत असताना बघे काहीही न करता फक्त पहात बसल्याचे दृश्य बघितल्यापासून अशा मुलांविषयी चीड होती व ती या घटनेतून बाहेर आली असे लेशपालने सांगितले.