बारामती तालुक्यातील एका खेड्यातील मेंढपाळाच्या मुलीने दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर बेसबॉल संघाच्या कर्णधारपर्यंत आकाशाला गवसणी घातली आहे.तरडोली येथील मेंढपाळ कन्या रेश्मा शिवाजी पुणेकर असे तिचे नाव आहे.सध्या सर्वत्र तिच्याच संघर्षाचे कौतुक होत आहे. लहानपणापासूनच शेळ्या मेंढ्या राखण्याचे ती काम करीत असे. यावेळी शेळ्या मेंढ्याच्या बकऱ्यांच्या मागे काठी घेऊन धावणे, काठीने दगड मारण्याचा खेळ खेळणे, दगड हातात घेऊन पीचींग करणे, हुंदडण्यात रेश्मा रमत असे. पण त्याच काठीच्या आकाराची स्लगर कधी भारतीय संघाची खेळाडू नव्हे तर भारतीय संघाचा कर्णधार बनली आहे.
रेश्मा हिने आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने हे चीन आणि हाँगकाँग देशात खेळले आहेत. तब्बल २३ राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले आहे. २८ राज्यस्तरीय सामने तसेच ४ गोल्ड मेडल, ६ रजत पदक, ३ कास्य पदक आणि महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार प्राप्त केला आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करणे तिचे ध्येय होते. हाँगकाँग, चीनसारख्या देशात जाऊन दोनवेळा एशियन स्पर्धा खेळून आलेली रेश्मा पुन्हा एकदा हाँगकाँग देशात होणाºया तिसºया आंतरराष्ट्रीय महिला एशियन कप २०२३ स्पर्धेत कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे.
तिसऱ्या आंतरराष्ट्रीय स्पधेर्साठी लागणाºया खचार्साठी तिच्याकडे आर्थिक चणचण आहे. रेश्मा ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शारिरीक शिक्षण विभागात एमपीएड या वर्गात शिकत आहे. स्पर्धेमध्ये मिळालेले करंडक, मेडल, प्रमाणपत्र, आदी यशाचा ठेवा ठेवण्यासाठी तिच्याकडे लाकडी कपाट सुद्धा नाही.आधुनिक उपकरणे, साहित्य तिच्या घरामध्ये नाही. तरी ती जिद्दीने खेळत आहे.रेश्माच्या स्वप्नपूर्तीसाठी तिच्या आई-वडीलांनी सर्व बकऱ्या, रान सुद्धा विकले. फक्त दोन बैलजोडी, काळ्या आईच्या उत्पन्नाच्या आशेवर रात्रीचा दिवस करीत आहेत.
खपणारे आई- वडिल काबाडकष्ट करीत आहेत. परंतु आजही तिची परिस्थिती काळ बनून तिच्यासमोर उभी आहे. तिच्या पंखांना बळ देण्यासाठी आर्थिक मदतीची आणि पाठिंब्याची गरज आहे. जिद्द, चिकाटी, आणि आत्मविश्वासाच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावणाऱ्या रेश्माला येत्या काळात आहार, खेळण्याच्या साहित्यासाठी व इतर खर्च कसा करायचा, हा प्रश्न आवासून उभा आहे. तिला हा खर्च पेलवणारा नाही. त्यामुळे रेश्मा हिच्यासाठी समाजातील दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे.
रेश्मा हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, लहानपणापासुनच खेळाची आवड होती.शाळेत या खेळाची ओळख झाली.आठवीतच न्यु इंग्लीश स्कुलमध्ये राष्ट्रीय खेळ खेळण्याची सुरवात झाली.अकरावीत शारदाबाई पवार महाविद्यालयात प्रवेश घेतला.महाविद्यालयाने मला चांगला ‘सपोर्ट’ केला. त्या ठीकाणी मोठे मैदान मिळाले.त्यामुळे चांगला सराव घेतला.खासदार सुप्रिया सुळे,कृषि विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनंदा पवार यांची मदत झाल्याचे रेश्मा हिने पत्रकारांशी बोलताना सांगितले.आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी नोकरी मिळण्याची गरज तिने व्यक्त केली आहे.