पाऊस गायब अन् धरणातील पाणीसाठ्यातही घट! पुणेकरांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा
By राजू हिंगे | Published: September 5, 2023 08:16 PM2023-09-05T20:16:03+5:302023-09-05T20:16:15+5:30
सप्टेंबर महिन्यात पाऊस समाधानकारक न पडल्यास पुणेकरांना पुन्हा पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावा लागण्याची शक्यता
पुणे: खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रात पाऊस गायब झाला आहे. त्यात शहराला पिण्यासाठी आणि कालव्यांतून शेतीला पाणी सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा आणखी कमी होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारी पानशेत आणि वरसगाव ही धरणे १०० टक्के भरली आहेत. खडकवासला धरणात ०.९८ टीएमसी म्हणजे ४९.४२ टक्के, टेमघरमध्ये २.९७ टीएमसी म्हणजे ८०.०३ टक्के पाणीसाठा आहे. चारही धरणांमध्ये २७.३७ टीएमसी म्हणजे ९३.८८ टक्के धरण भरलेले आहे.
वरसगाव धरणातून दोन सप्टेंबरपासून वीजनिर्मितीसाठी ६०० क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. पानशेत धरणातून वीजनिर्मितीसाठी तीन सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता ६०० क्युसेकचा विसर्ग सोडला आहे. दोन्ही धरणातून सोडलेला एकूण विसर्ग १२०० क्युसेक पाणी हे थेट खडकवासला धरणात जमा होत आहे.
सध्या धरणातून शेतीसाठी १००५ क्युसेकने पुरवठा सुरू आहे. खरिपासाठी कालवा १५ ऑक्टोबरपर्यंत सुरूरु राहील. सप्टेंबर महिन्यात पाऊस समाधानकारक न पडल्यास धरणातील पाणी साठ्याचा आढावा घेऊन पुणेकरांना पुन्हा पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावा लागण्याची शक्यता आहे.