बावडा: वडापुरी (ता. इंदापूर जि. पुणे) येथील अंबाजी लिंबाजी देवस्थानच्या पुष्पा शंकर कोमकर (वय ५५) या महिला पुजारी गंभीर स्वरूपाच्या घाव आलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांना आढळून आल्या. त्यानंतर त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय इंदापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर महिला पुजारी यांचा मृत्यू हा धक्कादायक घटनेतून झाली असल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसून येत आहे. सदरील घटनास्थळी इंदापूर पोलिसांचे पथक दाखल झाले असून अधिक तपासासाठी पुणे येथील डॉग स्कॉड व न्यायवैद्यक पथक पाचारण करण्यात आले आहे.
पुष्पा कोमकर या श्री अंबाजी लिंबाजी देवस्थान येथे गेल्या २० ते २५ वर्षापासून पुजारी म्हणून सेवा करीत होत्या. तसेच त्या तेथेच कायम वास्तव्यास असून किराणा दुकान चालवत उदरनिर्वाह आपल्या पतीसह करीत होत्या. आज (दि.१३) रोजी सकाळी नऊ ते दहा वाजल्याच्या दरम्यान त्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर स्वरूपाचे घाव तीन ते चार ठिकाणी आसलेल्या रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आल्या. कोमकर यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी मृत घोषित केले. अधिक तपासानंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी सांगितले.