पुणे : थंडीमध्ये फिरायला जात असाल तर पुढील आठवडा त्यासाठी अतिशय चांगला ठरणारा आहे. कारण पुढील आठवड्यातील हवामान अतिशय छान असणार आहे. गुलाबी थंडीमध्ये फिरायला जाण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कुठेही पाऊस नाही किंवा फिरण्यासाठी अडथळा नाही, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे बिनधास्त फिरायला जाता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कुठे ना कुठे पाऊस, गारपीट झाली. त्यामुळे एकूणच हवामान बिघडल्याचे पाहायला मिळाले. आता या थंडीमध्ये पुढील आठवडा फिरण्यासाठी उत्तम असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिला. पुढील आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहील, याची माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे. काही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण असू शकते. राज्यावर कोणतीही हवामान बदलाची यंत्रणा कार्यरत नाही. पुढील २४ तास उत्तरीय हवेचा प्रभाव राहील. परंतु, कुठेही पावसाची शक्यता नाही. ११ डिसेंबरपासून राज्यात किमान तापमानात वाढ होईल. पुणे व परिसरात पुढील ७२ तासांत धुके राहील. थंडीमध्ये अनेक जण फिरायला जातात.सध्या पहाटे धुक्याची दुलई अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे या काळात फिरणे व सकाळी लवकर उठणे हे आरोग्यदायी ठरते. म्हणून अनेकांचे फिरायला जाण्याचे प्लान या कालावधीत होत असतात.
पुढील दहा दिवस हवामान कोरडे
पहाटे प्रचंड थंडी आणि दुपारी उकाडा यामुळे राज्यामध्ये व पुण्यातही नागरिकांच्या तब्येतीवर परिणाम जाणवला. अनेकांना सर्दी, ताप, खोकला असे आजार झाले. ढगाळ वातावरण, पावसाचा अंदाज, किमान व कमाल तापमानातील चढ-उतार आदी कारणांमुळे एकूणच हवामान बिघडल्याचा अनुभव आला. आता इथून पुढील दहा दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तुम्ही सुटीचे नियोजन करत असाल आणि सहलीसाठी जाणार असाल तर पुढील आठवडा अतिशय छान आहे. पुढील ७ ते १० दिवस महाराष्ट्रात फिरण्यासाठी चांगले आहेत. हिवाळा हा आनंद साजरा करण्यासाठीचा ऋतू आहे. - अनुपम कश्यपी, प्रमुख, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे