"पंचांनी स्वत:च्या लेकरावर हात ठेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 02:14 PM2023-01-16T14:14:10+5:302023-01-16T16:53:00+5:30

पै.सिकंदर शेख याचे वडिल रशीद शेख यांनीही पंचांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच, एखाद्या गरिबावर असा अन्याय होऊ नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

The umpire should put his hand on his shoulder and say, was the decision correct in maharashtra kesari? Sikandar Father on media | "पंचांनी स्वत:च्या लेकरावर हात ठेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का?"

"पंचांनी स्वत:च्या लेकरावर हात ठेऊन सांगावं, तो निर्णय खरा होता का?"

googlenewsNext

पुणे/सोलापूर - शनिवारी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लागला आणि सोशल मीडियावर सिकंदर नावाचे वादळ घोगवले. पै. सिकंदरवर पंचांकडून अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागली. तर, हार कर जितनेवाले को सिकंदर कहत है... अशा पोस्टही व्हायरल झाल्या. त्यामुळे, पंचांच्या निर्णयावर कुस्तीविश्वात आणि सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उभा होत आहे. आता, पै.सिकंदर शेख याचे वडिल रशीद शेख यांनीही पंचांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. तसेच, एखाद्या गरिबावर असा अन्याय होऊ नये, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढले. मात्र, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांची कुस्ती वादाचा विषय ठरली. या लढतीतील पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. महेंद्र गायकवाडने सेमीफायनलमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, चर्चा सिकंदरच्या पराभवाचीच झाली. ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना रंगला. अतिशय रोमहर्षक आणि राज्याचं लक्ष लागलेल्या या सामन्यात शिवराज राक्षेनं विजय मिळवला. पण, या विजयापेक्षाही सेमीफानयलची लढत चर्चेत ठरली. 

सिकंदर आणि महेंद्र यांच्यातील लढतीत पंचांनी दिलेल्या ४ गुणांमुळे ही स्पर्धा वादात ठरली. स्पर्धेच्या निकालानंतर सिकंदरवर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. त्यामुळे, संपूर्ण दिवसभर सिकंदर सोशल मीडियात ट्रेंड झाला. सिकंदरलाही आपल्या पराभवाचं दु:ख झालं. तसेच, त्याच्या कुटुंबीयांनाही या पराभवाचं दु:ख झालं. म्हणूनच, त्याचे वडिल रविवारी दिवसभर उपाशीच राहिले. सिकंदरच्या वडिलांनी त्यांच्या मनातील भावना माध्यमांशी बोलून दाखवली. 

गरिबांना वाली कोण राहणार?

जर अन्याय होत असेल तर गरीबांना कोण वाली राहणार. त्याला जाणीवपूर्वक कमी गुण देण्यात आले आहेत. आमच्या मुलावर जो अन्याय झाला, तो इतर पैलवानांवर अन्याय होऊ नये असे सिकंदरच्या वडिलांनी म्हटले. ज्यांनी हा निर्णय दिला त्यांनी स्वत:च्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत सांगावे की, तो निर्णय योग्य आहे, अशी अपेक्षाही रशीद खान यांनी बोलून दाखवली.  

हमाली करुन सिकंदरला मोठं केलं 

आम्ही सिकंदरला हमाली करून मोठं केलं. दिवसरात्र काबाडकष्ट करून पैलवान केलं. सिकंदरनेही जोराचा सराव केला. वडिल आणि त्याच्या मेहनतीला बळ देणाऱ्या सर्वांच्या अपेक्षापूर्तीवर तो खरा ठरला. देशात नामांकित पैलवान म्हणून तो नावारुपाला आला, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही अंतिम फेरी गाठत त्याने जिंकून दाखवलं. मात्र, अंतिम सामन्यात पराभव झाल्याने सिकंदरच्या चाहत्यांची मोठी निराशा झाली. पण, या पराभवानंतर पंचाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. दरम्यान, सिंकदरच्या आई-वडिलांनीही नाराजी व्यक्त केली असून खर्चाची जबाबदारी उचलणारे उद्योजक रमेश बारस्कर हेसुद्धा रविवारी दिवसभर त्याच्याच घरी होते.

Web Title: The umpire should put his hand on his shoulder and say, was the decision correct in maharashtra kesari? Sikandar Father on media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.