पुणे : वाहतूक शाखेत वाहनचालक म्हणून कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिस पतीला सुट्टी न मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला आणि त्याच रागाच्या भरात पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समाेर येत आहे.
पाेलिस कर्मचाऱ्याची दि. ९ ऑगस्ट राेजी वाहतूक शाखेत वाहनचालक म्हणून बदली झाली हाेती; तर त्यांची पत्नी कारागृह विभागात कार्यरत आहे. पत्नीच्या सांगण्यानुसार, दि. २१ ऑगस्ट साेमवार राेजी किरकोळ रजा मिळावी याचा अर्ज त्याने शनिवारी (दि. १९) दिला हाेता. तसेच रविवारी (दि. २०) साप्ताहिक सुट्टीदेखील घेतली हाेती. साेमवारी सकाळी दोघांमध्ये सुट्टी मिळत नसल्याने पुन्हा वाद झाला. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने सुट्टी मिळावी यासाठी वरिष्ठांना काॅल केला होता. मात्र, त्यावर तुम्ही वाहन घेऊन यावे, असा मेसेज त्याला वरिष्ठांकडून आला हाेता. पतीला सुट्टी न मिळाल्याने पत्नीने रागाच्या भरात तुम्हाला सुट्टी कशी मिळत नाही, असे बाेलत आतील खोलीत जाऊन जाेरात दरवाजा बंद केला.
पतीला संशय आल्याने त्याने दरवाजा वाजवला. मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा पत्नी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. पत्नीला खाली उतरवत तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, महिलेवर उपचार सुरू असून, तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती कोथरूड पोलिसांनी दिली.
''संबंधित पोलिस कर्मचारी ९ ऑगस्ट रोजी वाहतूक शाखेत हजर झाला. त्याने १८ ऑगस्ट रोजी सुट्टी घेतली. रविवारी (दि. २०)ही रजा घेतली होती. त्याच्या सुट्टीबाबत कोणतीही तक्रार नाही. - विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा.''