इंदापूर : कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष,इंदापूर शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा यांचा पाठपुरावा, आ. दत्तात्रय भरणे यांचे प्रयत्न व त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चढवलेला कळस यामुळे शिरसोडी - कुगाव पुलाच्या कामासाठी ३८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या पुलामुळे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा भाग जोडला जाणार आहे.पुणे व सोलापूर हे जिल्हे जोडले जावून दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. सर्वात कमी वेळात झालेला हा निर्णय इंदापूर तालुक्याच्या प्रगतीच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरणार आहे. हा पूल व्हावा ही इंदापूरमधील सर्व व्यापा-यांची इच्छा होती. त्यामुळे शहर व्यापारी संघाचे अध्यक्ष भरत शहा व कार्यकारिणी सदस्य सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते. खा. सुप्रिया सुळे यांनी देखील व्यापा-यांच्या मागणीला हिरवा कंदील दिला होता. आ. भरणे व अजित पवार यांच्या भेटीत ही त्यांनी ही मागणी मांडली होती. शहराच्या दळणळणाची गरज लक्षात घेवून अजित पवार यांनी मागील महिन्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात पुलाचे काम करण्याची जाहीर हमी दिली. त्यानुसार हालचाली होवून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६५ वरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. अहमदनगर जिल्ह्यातील वाहतूक टेंभुर्णीमार्गे केली जाते. नियोजित पुलावरुनच यातील बहुतांश वाहतूक होणार आहे.त्यामुळे केवळ दोन जिल्हे किंवा तालुके जोडले जाणार नाहीत तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा जोडण्याचे काम झाले आहे. मात्र हा पूल राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर उभारला जाणे आवश्यक आहे. कारण येथून खूप मोठे दळणवळण होणार आहे.
मराठवाड्याच्या विकासाला चालना देणारा व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग असणार आहे. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र यातील तब्बल १०० किलोमीटरचे अंतर या पुलामुळे कमी होणार आहे. इंदापूर शहराची उलाढाल किमान पाचपटीने वाढणार आहे. करमाळा व इतर भागातील उसाला पश्चिम भागात मोठी बाजारपेठ निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक विकास होण्यास मदत होणार आहे. उजनी पाणलोट क्षेत्रातही इंदापूर, भिगवण,करमाळा हा पर्यटकांसाठी पाणीदार हिरवा त्रिकोण तयार होणार आहे.
या पुलामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या वाटा सुकर होतील. ग्रामीण भागातील लोकांना सहजतेने आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. मच्छीमारांना इंदापूर व भिगवण या नाणावलेल्या माशांच्या बाजारपेठा काबीज करता येतील. करमाळा तालुक्यातील तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होतील, असे एकंदरीत चित्र आहे.