पुणेकरांची वर्षभराची चिंता मिटली! खडकवासला साखळीतील चारही धरणे ‘फुल्ल’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 09:55 AM2022-08-17T09:55:22+5:302022-08-17T09:55:41+5:30
चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला प्रकल्पातील चारही धरणे ओव्हरफ्लाे झाली आहेत. यामुळे शहराची पिण्याच्या पाण्याची व ग्रामीण भागातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे. या चारही धरणांत मिळून २९ टीएमसी पाणीसाठा झाल्याने ‘खडकवासला’तून मुठा नदीत विसर्ग सुरू आहे.
टेमघर, वरसगाव, पानशेत व खडकवासला या चार धरणांमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदाच्या हंगामात प्रथम १२ जुलै रोजी खडकवासला धरण १०० टक्के भरले हाेते. त्यानंतर पानशेत धरण ११ ऑगस्ट, तर वरसगाव धरण १३ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले. खडकवासला धरण साखळी मधील टेमघर धरण १६ ऑगस्टला ९५ टक्के भरले आहे. या चारही धरणांमधील पाणीसाठा २८.९७ टीएमसी अर्थात ९९.३७ टक्के झाला आहे.
दरम्यान, मंगळवारी दिवसभरात टेमघर धरण परिसरात २५ मिमी, वरसगाव १६, पानशेत १७, तर खडकवासला धरण क्षेत्रात १ मिमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. चारही धरणे जवळपास १०० टक्के भरल्याने खडकवासला धरणातून ४,७०८ तर पानशेत धरणातून १,९५४ क्युसेकने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.
धरणांत सुमारे २९ टीएमसी पाणीसाठा
जूनमध्ये पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे शहरात पाणीकपात सुरू झाली होती. मात्र, त्यानंतर जुलैत चांगल्या पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे १४ जुलैला खडकवासला धरण १०० टक्के भरले. त्यानंतर ऑगस्टमध्ये ही दमदार पाऊस झाल्याने पानशेत व वरसगाव ही धरणे तुडुंब भरली. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली. आता टेमघर धरणही भरत आल्याने चारही धरणांत सुमारे २९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणे पूर्ण भरल्याने ग्रामीण भागाच्या शेतीच्या सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
गेल्या वर्षी चारही धरणांमध्ये एकूण २७.९५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. यंदा त्यापेक्षा एक टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. - योगेश भंडलकर, सहायक अभियंता, जलसंपदा विभाग