ग्राहक पंचायतीने पकडली भक्तीच्या दरवळातील चोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 07:00 AM2018-12-07T07:00:00+5:302018-12-07T07:00:02+5:30
उदबत्तीसारख्या भक्ती सधानांचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांकडून देखील ग्राहकांची लुट सुरु असल्याचा प्रकार उघड झाला आहे.
विशाल शिर्के
पुणे : उदबत्तीसारख्या भक्ती सधानांचा उद्योग करणाऱ्या कंपन्यांकडून देखील ग्राहकांची लुट सुरु असल्याचा प्रकार उघड झाला आहे. उदबत्ती कंपनी कडून वजनात होणारी चोरी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पडकली असून, त्याची तक्रार वैधमापन शास्त्र विभागाकडे केली आहे. प्रथितयश कंपनीची टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधनाची क्रिम, जंतूनाशक कंपन्यांचे साबण, दररोजच्या वापरातील साबण, थंडीपासून त्वचेचे संरक्षण करणारी पेट्रोलियम जेली, चहा, शॅम्पू, कपड्यावरील कोणताही डाग काढून टाकण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांची पावडर आणि बिस्कीट अशा विविध १४ उत्पादनांमध्ये कंपन्यांकडून कशी लूट केली जाते, हे नुकतेच लोकमतने उघड केले आहे. त्या पाठोपाठ उदबत्ती बनविणारी कंपनी देखील अशा वजन चोरीत मागे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने कॉर्पोरेट कंपन्यांची लबाडी पकडल्यानंतर भक्ती मार्गातील चोरी देखील धरली आहे. या बाबत माहिती देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विजय सागर म्हणाले, मिलिटरी कँटीनमधून एका ब्रँडचे उदबत्तीचे पाकिट खरेदी केले होते. त्यावर वजन ३० ग्रॅम वजनाची एमआरपी ४१ असल्याचे छापण्यात आले आहे. प्रत्यक्षात उदबत्तीचे वजन केले असता ते केवळ १९ ग्रॅम भरले. तर, त्याच्या पाकिटाचे वजन ३५ ग्रॅम आहे. या बाबत वैधमापनशास्त्र विभाग आणि डीआरडीओच्या कार्यालयाकडे तक्रार केली आहे.
-------------
मिलिटरी कॅन्टीनमधून कंपनीच्या किती उदबत्ती पाकिटांची विक्री झाली याचा हिशेब करुन सबंधित कंपनीकडून दंडासह रक्कमेची वसुली केली पाहीजे.
विजय सागर, अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे
--------------
ग्राहकांची कोणीच घेईना दखल
कॉफी, टूथपेस्ट, सौंदर्य प्रसाधने आणि उदबत्ती अशा विविध दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये ग्राहकांची लूट झाल्याचे ग्राहक पंचायतीने समोर आणले आहे. या प्रकरणी राज्याचा वैधमानशास्त्र विभाग, ग्राहक मंत्रालय, वाणिज्य मंत्रालय, कॉम्पिटीशन कमिशन अॅफ इंडिया आणि अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कमिशन आॅफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यातील अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कमिशन आॅफ इंडियाने संबंधित प्रश्न आमच्या आखत्यारीत येत नसल्याचे कळविले आहे. इतर विभागांनी तक्रारीची दखल देखील घेतली नसल्याचे, अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणेचे अध्यक्ष विजय सागर म्हणाले.
-------