पुण्यातील २५० वर्ष जुन्या मंदिरात चोरी; चांदीच्या प्राचीन मूर्ती, मखर घेऊन चोरटे पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 08:37 AM2024-03-25T08:37:27+5:302024-03-25T08:37:49+5:30
तीन अनोळखी इसम दुचाकीवरून खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आले...
- किरण शिंदे
पुणे : सदाशिव पेठेतील प्रसिद्ध खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी आठ मार्चच्या रात्री मंदिरात प्रवेश करून जबरी चोरी केली. चोरट्यांनी मंदिरातील कपाटाचे कुलूप तोडून देवाच्या मूर्ती आणि मखर चोरून नेले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गौरव ज्ञानेश्वर सिन्नरकर (वय ३८, सदाशिव पेठ खजिना विहिर चौक पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ मार्च रोजी तीन वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी इसम दुचाकीवरून खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात आले. त्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजाचे आणि मंदिरातील गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडले. मंदिरातील कपाटाचेही कुलूप तोडले आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीची विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, चांदीची गणपतीची मूर्ती, तुळजाभवानीची पितळेची मूर्ती आणि भिंतीवर लावलेलं चांदीचं मखर अशा एकूण ४१ हजार ५०० रुपयांच्या वस्तू चोरून नेल्या.
चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात चोरट्याविरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक फरताडे करत आहे. खजिना विहीर विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे २५० वर्षांपूर्वीचे असल्याची इतिहासात माहिती आहे. पुण्यातील जुन्या मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो. मंदिरातील मूर्ती देखील अडीचशे वर्ष जुन्या असल्याचे सांगितले जाते. मात्र आता याच मूर्ती चोरीला गेल्याने चोरांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.