पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दरवाजाआड झालेली चर्चा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब यामुळे राज्याच्या राजकारणात नवे राजकीय वारे वाहू लागले आहे. राज्यात राजकीय भूकंप होऊन भाजप- शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येण्याच्या चर्चा देखील खुलेआम झडू लागल्या आहेत. याच दरम्यान दोन्हीही पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींकडूनही उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी देखील भाजप आणि शिवसेना युती शक्य असल्याचे मत व्यक्त करतानाच पुणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा शिवसेनेला सोबत घेण्याला आम्ही प्राधान्य देऊ असेही स्पष्ट केले आहे.
पुण्यात गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजप व शिवसेनेवर नाते संबंधांवर नेमकं भाष्य केले. बापट म्हणाले, आमची शिवसेनेसोबतची युती ही नैसर्गिक आहे. पण मध्यंतरीच्या काळात ही युती काही लोकांमुळे तुटली.पण भविष्यात अशी युती झाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल.तसेच भाजप आणि शिवसेना युती ही हिंदुत्वावर आधारित आहे.ती आगामी काळात सुद्धा होऊ शकते.कारण दोन्ही पक्षांचा हिंदुत्व हा श्वास आहे.
पुणे महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार..आगामी काळात होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचीच सत्ता पुन्हा येणार आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसला मी एक प्रमुख पक्ष मानत नाही, तर ती एक पश्चिम महाराष्ट्रातील एक पार्टी आहे. महापालिकेच्या निवडणुकीत दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाऊ द्या, असे आव्हान देखील बापटांनी यावेळी दिले.
आता निर्णय शिवसेनेने घ्यायचा...
शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या लेटर बॉम्ब बद्दल बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले, सरनाईक हे सगळ्यांच्या मनातील बोलले आहे.आता निर्णय काय हे शिवसेनेच्या हाती आहे.भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेनेत युती शक्य आहे.
अजितदादा शरद पवारांचं ऐकत नाही हे माहिती होतं, पण.....राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला झालेली गर्दीवरून बापटांनी थेट अजित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, अजित पवार हे शरद पवारांचं ऐकत नाही हे माहिती होतं, पण दादांचे कार्यकर्ते त्यांचं ऐकत नाही हे मी पहिल्यांदा पाहतोय.