पुणे : विद्यार्थी वाहतुकीची जबाबदारी टाळण्यासाठी शाळा स्कूलबसचालकांशी करार करण्यास तयार नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळांनी आडमुठेपणा केल्यास स्कूलबसचालकांना पालकांशी वैयक्तिक करार करण्याची मुभा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. कराराच्या पेचप्रसंगातून तोडगा काढण्यासाठी स्कूलबसचालकांपुढील हा चांगला पर्याय ठरणार आहे.नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, पोलीस उपायुक्त (वाहतूक) विश्वास पांढरे, शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे, सदस्य सचिव अनिल पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.सुरक्षित विद्यार्थी वाहतूक, महिला सहायक असणे बंधनकारक, बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या स्कूलबसचालकांवर कारवाई आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. शाळांकडून विद्यार्थी वाहतूक समित्यांची स्थापना केली जात नाही, याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याचा विषय या वेळी चर्चिला गेला. प्रत्येक शाळेने स्कूलबसचालकांशी करार करणे बंधनकारक आहे. करार झाल्यानंतरच त्यांना आरटीओकडून परवाना दिला जातो. करारानुसार विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळा व्यवस्थापनही जबाबदार ठरते; त्यामुळे बहुतांश शाळांकडून स्कूलबसचालकांशी करार करण्यास नकार दिला जातो. यामुळे आरटीओकडून परवाना मिळविण्यात अडचणी येतात. (प्रतिनिधी)
...तर स्कूलबसचालक, पालकांत करार
By admin | Published: June 14, 2014 12:01 AM