पुणे : लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने गणेशमूर्तींच्या नोंदणीसाठी भाविकांची लगबग सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा होणार असून विसर्जनासाठी हौदांची व्यवस्था केली जाणार नसल्याने पीओपीची गणेश मूर्ती घरच्या घरीच विसर्जित कशी करायची, या पेचात भाविक सापडले आहेत. त्यांच्यासाठी मातीपासून बनविलेली ‘वृक्ष गणेश’ किंवा कागद्याच्या लगद्यापासून बनविलेल्या आकर्षक गणेशमूर्ती उपलब्ध झाल्या आहेत. शाडूच्या मूर्तींपेक्षाही या मूर्तींची किंंमत कमी असल्याने या पर्यावरणपूरक मूर्तींना चांगली मागणी आहे.
दरवर्षी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅॅरिससह शाडूच्या पर्यावरणपूरक मूर्तींना मागणी असते. मात्र, शाडूची मूर्ती हाताळण्यास नाजूक असल्याने ती लवकर भग्न पावण्याची भीती असते. शाडूच्या मूर्तीची किंमतही अधिक आहे. त्यामुळे पीओपीच्या मूर्ती खरेदी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मार्च २०२० मध्ये कोरोना संकट आल्यापासून घरच्या घरी मूर्ती विसर्जन करण्याची सक्ती झाली आहे. यामुळे ‘इको फ्रेंडली’ मूर्तीकडे भाविकांचा कल वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
चौकट
“आम्ही ‘वृक्ष गणेश’ संकल्पनेवर आधारित गणेश मूर्तींची विक्री करतो. या मूर्ती शंभर टक्के पर्यावरणपूरक असून याद्वारे वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले जात आहे. ही मूर्ती पूर्णपणे शेत मातीपासून बनते. मूर्ती खरेदी करणाऱ्याला चंदेरी पाट, शेतमातीने भरलेली कुंडी आणि बियाण्यांचे पाकीट दिले जाते. विसर्जनाच्या वेळी मूर्ती पाण्यात बुडवल्यानंतर पाऊण तासात ती विरघळते. मग साचलेली ओली माती आणि त्यानंतर बियाणे कुंडीत टाकायचे. या मूर्ती तयार करण्यास एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या या मूर्तींना चांगली मागणी आहे.”
- अनिकेत राऊत, मूर्ती विक्रेते
चौकट
“परदेशात जल प्रदूषणाचे नियम अधिक कडक आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी पीओपीच्या मूर्ती पाठविणे शक्य नाही. शाडूच्या मूर्ती हाताळण्यास नाजूक असल्याने त्या पाठवता येत नाहीत. यात कागद्याच्या लगद्यापासून तयार केलेल्या गणेशमूर्ती हा उत्तम पर्याय आहे. पेणच्या काही कारागिरांना आम्ही शाडूच्या मूर्तीमध्ये मिसळण्यासाठी ‘पेपर पल्प’ देतो. ९० टक्के कागदी पल्प आणि १० टक्के शाडू माती याद्वारे या मूर्ती तयार होतात. तीन प्रकारांमध्ये या ९ इंचांच्या मूर्ती बनविण्यात आल्या. यात पारंपरिक रंगांचा वापर करीत बनविलेल्या मूर्ती, केशरी रंगातील सोनेरी नक्षीच्या मूर्ती व खास लहान मुले स्वत: रंगवू शकतील अशा पांढऱ्या मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती पाण्यात सहज विरघळतात. शिवाय पुन्हा कागद्याच्या लगद्यात रुपांतर करून त्यांचा पुनर्वापर देखील करता येऊ शकतो.”
शोभना हडप, हातकागद संस्था, पुणे