पुणे नाट्य परिषदेच्या १९ जागांसाठी तब्बल तिप्पट अर्ज झाले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 03:38 AM2018-09-29T03:38:58+5:302018-09-29T03:39:06+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची चांगलीच भाऊगर्दी झाली आहे. पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या १९ जागांसाठी तिप्पट म्हणजे ५७ अर्ज दाखल झाले आहेत.
पुणे - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारांची चांगलीच भाऊगर्दी झाली आहे. पुणे शाखेच्या कार्यकारिणीच्या १९ जागांसाठी तिप्पट म्हणजे ५७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक तीन पॅनेलमध्ये रंगणार आहे.
निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरूवारी शेवटचा दिवस होता. नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ‘रंगधर्मी’ या पँनेलची घोषणा करीत या पँनेलमधील १९ जणांनी अर्ज भरले. डॉ. देसाई यांच्यासह विद्यमान अध्यक्ष सुरेश देशमुख यांच्यासह माजी अध्यक्ष प्रदीपकुमार कांबळे यांची पॅनेल देखील निवडणुकीमध्ये असणार आहेत, मात्र त्याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि प्रमुख कार्यवाह दीपक रेगे देशमुख यांच्या पॅनेलमध्ये आहेत. तर, नाट्यअभिनेत्री भाग्यश्री देसाई आणि निकिता मोघे यांचा डॉ. सतीश देसाई यांच्या पॅनेलमध्ये समावेश आहे. प्रदीकुमार कांबळे यांनी आपल्या पॅनेलमध्ये नाट्यव्यवस्थापकांना संधी दिली आहे. उमेदवारांच्या अर्जांची छाननी उद्या (२८ सप्टेंबर) होणार असून, शनिवारी (२९ सप्टेंबर) निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. परिषदेचे दीड हजार आजीव सभासद मतदार आहेत. टिळक स्मारक मंदिर येथील नाट्य परिषद कार्यालयामध्ये ७ आॅक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सर्वाधिक मते संपादन करणारे १९ उमेदवारांना विजयी घोषित होतील. मतदारयादीमध्ये २५ सदस्य असे आहेत, त्यातील काही जण आज हयात नाहीत किंवा काहींचे पत्ते बदलले आहेत, नवीन पत्यांचा उल्लेख नाही त्यामुळे प्रमोद आडकर यांनी आक्षेप घेणारे पत्र निवडणूक अधिकारी शिरीष जानोरकर यांना दिले आहे. यासंदर्भात विचारले असता जानोरकर म्हणाले, यादीसंदर्भात काही आक्षेप असतील किं वा बदल असतील तर त्याबाबत हरकत घेण्यासंबंधी मुदत दिली होती. जे सदस्य हयात नाहीत त्यांच्या कुटुंबियांनी पुढाकार घेऊन परिषदेला माहिती द्यायला हवी होती. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे परिषद काहीही करू शकत नाही आणि आडकर यांनी मुदत संपल्यावर पत्र दिल्याने त्याची फारशी दखल घेतली नाही.