दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही
By निलेश राऊत | Published: May 6, 2023 05:30 PM2023-05-06T17:30:46+5:302023-05-06T17:30:56+5:30
पुणे महापालिकेच्या हद्दीत दहावी व बारावीच्या परीक्षेत परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते
पुणे: पुणे महापालिकेच्या सामाजिक विकास विभागाकडून १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीचे वाटप शैक्षणिक वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप पूर्णत: वितरीत करण्यात आलेली नाही. अनेक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीचे पैसेच जमा झाले नसल्याचे प्रकार समाेर आले आहेत.
याबाबत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी व माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.कुणाल खेमनार यांच्याकडे तक्रार केली आहे. दरम्यान डॉ.खेमनार यांनी येत्या सोमवारी समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांची शिष्यवृत्ती वाटपासंदर्भात बैठक बोलविली असल्याची माहिती बधे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक योजना आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना राबविण्यात येत आहे. इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुसार यंदाच्या वर्षी दहावीच्या ८ हजार ३२२ तर बारावी उत्तीर्ण झालेल्या २ हजार ६०७ असे एकूण १० हजार ९२९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मार्च अखेर सर्वांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीचे पैसे जमा होतील असे समाज विकास विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र आजही अनेक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे उघडकीस आले आहे. समाज विकास विभागाच्या गलथान कारभारामुळे आणि विद्यार्थ्यांच्या विषयी असलेल्या अनास्थेमुळे याकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप बधे यांनी केला आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून सर्व प्रात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र काही विद्यार्थ्यांनी बँक खात्याचा क्रमांक चुकीचा दिल्याने ते पैसे परत आले आहेत. अशा किती विद्यार्थ्यांचे पैसे परत आले आहेत याची माहिती घेतली जात असून, लवकरच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील. अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी लोकमतशी बोलताना दिली.