मंचर : शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारभाव नसल्याने बाजारपेठेवर काहीसे मंदीचे सावट आहे. याचा परिणाम सणांवर जाणवत असून रक्षाबंधन सणासाठी राख्यांचे स्टॉल सजले असूनही राख्यांना अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे या वर्षी उलाढाल मंदावणार आहे. ग्राहकांची कमी दराच्या राख्यांना मागणी असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.महिलांसाठी महत्त्वाचा असणारा रक्षाबंधन सण रविवारी साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंचर शहरात राख्यांचे स्टॉल सजले आहेत. लहान बालकांपासून ते तरुणवर्ग, वृद्धांसाठी अनेक प्रकारच्या राख्या बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. बालचमूंसाठी डॉल, लाईट म्युझिक, कार्टूनचे विविध प्रकार शिन्चॅन, मोटू पतलू, छोटा भीम, बेन्टेन अशा अनेक प्रकारच्या राख्या विक्रीसाठी ठेवल्या असून लहान मुलांचे ते आकर्षण आहे. तरुणवर्गासाठी डायमंड, ब्रेसलेट, क्रिस्टल खडे, रुद्राक्ष याशिवाय वृद्धांसाठी स्पंज, रेशीमदोरी, गोंडा इ. प्रकारच्या राख्या उपलब्ध असल्याची माहिती विक्रेते सोमनाथ फल्ले यांनी दिली.दरम्यान, शेतकºयांच्या शेतमालाला बाजारभाव नाही, शेतकºयांचे चलन फिरत नसल्याने काहीसे मंदीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम राख्यांच्या विक्रीवर होतो. राख्यांना अपेक्षित मागणी नसून कमी किमतीच्या राख्या घेण्याकडे ग्राहकांचा कल असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.आंबेगाव तालुक्यात रक्षाबंधन सणाच्या वेळेस राख्यांच्या विक्रीतून सुमारे ५० लाख रुपयांची उलाढाल होते. या वर्षी ही उलाढाल ४० लाख रुपये होण्याची शक्यता आहे. मंचर शहरात जागोजागी उभारण्यात आलेल्या राख्यांच्या स्टॉलमध्ये होलसेल खरेदी केली जात आहे. किरकोळ विक्री सुरु झाली असून रविवारी राख्यांची विक्री सर्वाधिक होईल.
राख्यांना अपेक्षित मागणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:59 AM