अभिवादनाला आलेल्या गर्दीवर होता १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 01:10 AM2019-01-03T01:10:18+5:302019-01-03T01:10:41+5:30
राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमांवर तसेच हालचालींवर तब्बल १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’ होता.
पुणे : राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमांवर तसेच हालचालींवर तब्बल १६ तपास यंत्रणांचा ‘वॉच’ होता. यामध्ये इंटेलिजेन्स ब्युरो (आयबी), राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), राज्य गुप्त वार्ता विभाग (एसआयडी), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), पुणे शहर पोलीस, जिल्हा पोलीस प्रशासनाचा यामध्ये समावेश होता. जवळपास २५० गुप्तहेर साध्या वेषात जागोजागी सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते.
एकंदरीत तपास यंत्रणांकडे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, २०१४ साली कोरेगाव भीमा येथे काही आक्षेपार्ह पत्रके वाटण्यात आलेली होती. तेव्हापासूनचा हा कट शिजत असल्याचा संशय होता. त्यापार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाच्या सूचनांप्रमाणे, मंगळवारी आयबी, एनआयएचे स्थानिक अधिकारी, सीआयडी, एसआयडी, एटीएस, पुणे पोलिसांच्या स्थानिक गुप्त शाखांचे पोलीस साध्या वेशात गर्दीमध्ये मिसळलेले होते. अनेकांनी भीमसैनिकांचे वेष परिधान केले होते. गर्दीमध्ये नेमकी काय चर्चा आहे, नेते आणि पदाधिकारी काय भाषणे देत आहेत, त्यातील मजकूर काय आहे, अशा अनेक बाबींवर २५० गुप्तहेर पोलीस लक्ष ठेवून होते. अभिवादन स्थळापासून पाच ते सात किलोमीटरपर्यंत मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते.
तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - आझाद
गुजरातपाठोपाठ महाराष्ट्रालाही तेढ निर्माण करणाऱ्या प्रयोगाची भूमी बनविण्याचा प्रयत्न भाजपा करीत आहे, अशी टीका भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी लातूर येथे पत्रपरिषदेत केली.
आझाद यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली. ते म्हणाले, भाजपा सरकार फुले-शाहू-आंबेडकर विचारांच्या विरोधातील असल्याने मला बोलू दिले जात नाही.