मुंबई - पुण्यात अनेक जुन्या बेकऱ्या फार प्रसिद्ध आहेत. आजही अनेक जुन्या बेकऱ्या आपल्याला पुण्यात पहायला मिळतात. गेल्या काही काळात ब्रेडसारख्या पदार्थांमध्येही अनेक व्हरायटी उपलब्ध असल्याने बेकरी उत्पादने आणि त्यांची विक्रीही जोरात आहे. आज आपण पुण्यातील काही प्रसिद्ध आणि जुन्या बेकरींविषयी जाणून घेणार आहोत.
रॉयल बेकरी अॅण्ड कन्फेक्शनरी
पुण्यातील सगळ्यात जुनी बेकरी म्हणून प्रसिद्ध असलेली रॉयल बेकरी अॅण्ड कन्फेक्शनरी १९१० साली स्थापन झाली होती. या बेकरीचे संस्थापक पूर्वी ब्रिटीश अधिकाऱ्यांना ब्रेड विकत असत. आता या बेकरीमधील ब्रून्स आणि मिल्क ब्रेड फार प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ब्रेडसाठी ग्राहकांकडून मोठी मागणी होत असते. या बेकरीच्या व्यवस्थापक सांगतात की, ‘ब्रेड बनवण्याची ही रेसिपी फार जुनी असून आमच्या आजोबांच्या काळापासून आम्ही जुनीच पद्धत वापरत आहोत. म्हणूनच ग्राहकांना आजही येथील बेकरीची उत्पादनं आवडतात. या ब्रेडसाठी लोकांच्या नेहमीच रांगा लागलेल्या असतात. रोल्स आणि हॉट क्रॉस बन्सही येथे फार प्रसिद्ध आहेत. एम.जी रोड पुणे कॅम्पजवळ ही बेकरी आहे.
इम्पेरिअल बेकरी
पुण्यातील जवळपास सर्वच इराणी कॅफेमध्ये बन्स आणि ब्रून्स पुरवणारी इम्पेरिअल बेकरी ही एकमेव बेकरी आहे. गव्हाच्या आणि ब्राऊन ब्रेड्सला येथे फार मागणी असते. इतर बेकरीपेक्षा या बेकरीमध्ये फार कमी प्रमाणात उत्पादन होत असलं तरीही ती सगळीच उत्पादनं ग्राहकांना आवडत असतात. १९५० पासून ही बेकरी पुण्यात अस्तित्वात आाहे. पुलगेट पोस्ट ऑफिसच्या बाजूला ही बेकरी आहे.
कयानी बेकरी
१९५५ साली स्थापन झालेल्या या कयानी बेकरीमध्ये व्हाईट मिल्क ब्रेड फार प्रसिद्ध आहे. विकेंड्सला इकडे जवळपास ४०० ग्राहक तरी भेट देत असतात असं सांगण्यात येतं. इकडच्या बेकरी उत्पादनांची किंमतही कमी असल्याने ग्राहकांची ये-जा सुरूच असते. मावा केक, बेरी बिस्किट्स आणि खारीसाठीही कयानी बेकरी फार प्रसिद्ध आहे.
मार्झ ओ रिन
सँडविच आणि बर्गरसाठी लागणारे सर्व प्रकारचे ब्रेड्स मार्झ ओ रिन या बेकरीत मिळतात. १९६५ सालापासून ही बेकरी असून दुकानाच्या मागच्या बाजूलाच या बेकरीची भट्टी आहे. ज्वारी, गहू, मका इत्यादी पौष्टीक साहित्यांपासून ब्रेड बनवला जातो. केक आणि पेस्ट्रीजही येथे फार प्रसिद्ध आहेत. एम.जी रोडच्या बक्खतिआर प्लाझामध्ये ही बेकरी आहे.
डायमंड बेकरी
व्हाईट ब्रेडसाठी प्रसिद्ध असलेली हायमंड बेकरी २००२ साली स्थापन झाली आहे. साखर आणि दुधापासून बनवलेला हा व्हाईट ब्रेड चहासोबत खाल्ला जातो. नाश्त्यासाठी हा ब्रेड फार पौष्टीक असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे दिवसातून जवळपास ३०० ते ५०० ब्रेड विकले जातात. याव्यतिरिक्त अलमंड मॅकारुन्स, ब्राऊनिस आणि सँडविच या बेकरीत प्रसिद्ध आहे. फातिमा नगर येथे ही बेकरी आहे.
ब्रेड स्टोरी
विविध ब्रेड्ससाठी ब्रेड स्टोरी ही बेकरी फार प्रसिद्ध आहे. २००५ साली स्थापन झालेल्या या बेकरीत गव्हापासून बनवलेले ब्रेड्स फार प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे इतर विदेशी पद्धतीचे ब्रेड्सलाही येथे प्रचंड मागणी असते. विमन नगरच्या खालसा डेअरीच्या मागे ही बेकरी आहे.
पुणे बेकींग कंपनी
इटालियन ब्रेड्ससाठी प्रसिद्ध असलेली ही पुणे बेकींग कंपनी २०१०साली स्थापन झाली आहे. या बेकरीत रेक्स मिलानो फार प्रसिद्ध आहे. राय नावाच्या एका धान्यापासून हा ब्रेड बनवला जातो. या आगळ्या वेगळ्या ब्रेड बनवण्याच्या पद्धतीमुळे ही बेकरी अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याचप्रमाणे रोजमरी फोकासिआ आणि ऑलिव्ह सिआबाटा ही उत्पादनेही येथे मिळतात. शिवाजी नगरमध्ये ही बेकरी आहे.
अरकीस बॉर्न बेकर्स
इटालियन ब्रेड्ससाठी प्रसिद्ध असलेली अरकीस बॉर्न बेकर्सची स्थापना २०१२ साली झाली आहे. या बेकरीत तुम्हाला इतर देशातील ब्रेड्स मिळू शकतील. सिआबाटा, पानिनी आणि गव्हापासून बनवलेली बेकरीची अनेक उत्पादनं येथे मिळतात. सँडविचसाठी वापरण्यात येणारे ब्रेडही पूर्णतः गव्हाच्या पिठापासूनच बनवलेले असतात. केक किंवा इतर उत्पादन बनवण्यापासून ते त्या पदार्थांच्या पॅकेजिंगपर्यंत सारं काही याच दुकानात केलं जातं. त्याचप्रमाणे हनी रोज पेटल केकलाही या बेकरीतून जास्त मागणी असते. लुल्ला नगर येथील कोंडवाडा रोड येथे ही बेकरी आहे.
पुणे खऱ्या अर्थाने खवय्ये म्हणवले जातात आणि या खवय्या पुणेकरांसाठी या सर्व बेकऱ्या म्हणजे एक पर्वणीच आहे. इतकी वर्ष झाली तरीही त्या बेकऱ्या पुणेकऱ्यांच्या कायमच पसंतीच्या राहील्या आहेत.