पिंपरी : गृृहनिर्माण सोसायटी पुनर्विकासासाठी आठ वर्षांत चाळीसवेळा चकरा मारल्या, तरीही धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासाला मंजुरी मिळाली नाही. मात्र, जानेवारी महिन्यात शरद पवार यांची भेट झाली अन् रखडलेला प्रकल्प अवघ्या आठ दिवसांत मार्गी लागला, हा अनुभव आहे गोखलेनगर, पुणे येथील म्हाडाच्या एमआयजी कॉलनीतील रहिवाशी व ज्येष्ठ नागरिक रमेश सूर्यवंशी यांचा.
पुण्यातील विविध भागात १९८० च्या काळात म्हाडाकडून अनेक गृहनिर्माण सोसायट्या उभारल्या. इमारतींचे आयुष्य ३० वर्षे असल्याने २०१० नंतर पुनर्विकास गरजेचा होता. मात्र, गेल्या १० वर्षांपासून पुनर्विकासाच्या फाईल म्हाडा कार्यालयात धूळ खात आहेत. त्यात एमआयजी कॉलनी क्रमांक १० येथील १६ सभासदांच्या इमारतीचा प्रश्नही रखडला होता. त्याविषयी रमेश सूर्यवंशी म्हणाले, ‘‘२०१२ मध्ये सोसायटीचे कन्व्हिन्स डीड झाले. त्यानंतर पुनर्विकासासाठी म्हाडाच्या कार्यालयात फाईल मंजुरीसाठी अनेक चकरा मारल्या. कार्यालयातून दोन वेळा फाईल गायब झाली. त्यानंतर पुन्हा नवी फाईल घेऊन मंजुरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री, मंत्री, म्हाडाचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करूनही दाद मिळाली नाही. तरीही आम्ही प्रयत्न आणि आशा सोडली नाही.
नवीन वर्षात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्याचे आधारस्तंभ असलेल्या शरद पवार यांचे अभिनंदन आणि म्हाडा कॉलनी पुनर्विकासासंदर्भात विनंती पत्र त्यांना पाठविले. त्यानंतर ६ जानेवारीला मला फोन आला. मुंबईतील पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेटण्यासाठी वेळी दिला. शिष्टमंडळासह भेटलो. तेव्हा तिथे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते. त्यांनी सर्व माहिती घेऊन पुन्हा तुम्हाला पवार साहेबांना भेटावे लागणार नाही, असे आश्वस्त केले. आठ दिवसांतच फाईल मंजूर झाल्याचा फोन म्हाडाच्या मुंबई कार्यालयातून आला. तब्बल ४० वर्षांनंतर मंजूर झालेले पुण्यातील हा पहिला प्रकल्प आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून सर्वांसाठी आदर्श ठरणार आहे.’’
नेत्याने मनात आणले , तर कोणतेही काम झपाट्याने होऊ शकते
एखाद्या नेत्याने मनात आणले, तर कोणतेही काम झपाट्याने होऊ शकते. आठ वर्षे रखडलेला प्रकल्प शरद पवार यांच्यामुळे आठ दिवसांत मार्गी लागण्याचा म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पाचा आमचा अनुभव आहे. - रमेश सूर्यवंशी, ज्येष्ठ नागरिक व रहिवासी.