पुणे : एक जून ह्या सरासरी तारखेला केरळात आदळणारा मान्सून ४ दिवस उशिराने म्हणजे ४ जूनला अपेक्षित होता. त्यातही कमी अधिक ४ दिवसांचा फरक जमेस धरून तो केरळात १ जून ते ८ जून दरम्यान कधीही दाखल होऊ शकतो, असेच भाकीत भारतीय हवामान खात्याकडून वर्तविले होते. त्याप्रमाणे मान्सून गुरुवारी (दि. ८) केरळात दाखल झाला, अशी माहिती हवामाशास्त्र तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. आग्नेय अरबी समुद्रात व केरळ किनारपट्टी समोर ढगांची दाटी झाली आहे, असेही ते म्हणाले.
नैऋत्य मान्सून आगमनाच्या त्याच्या अटी पूर्ण करून जवळपास केरळचा संपूर्ण भाग व तामिळनाडूचा ३० टक्के भाग कव्हर करून देशाच्या भूभागावर दाखल झाला आहे. त्याची उच्चतम सीमा केरळातील कनूर, तामिळनाडूतील कोडाईकनल व आदिरामपट्टीनाम शहरातून जाते.
खुळे म्हणाले, ‘मान्सून दाखल होण्याच्या घोषणेसाठी हव्या असलेल्या अटींपैकी काही अटी पूर्ण केलेल्या आहेत. त्यामध्ये अरबी समुद्रातून पश्चिमेकडून पूर्वेकडे समुद्रसपाटीपासून उंच आकाशात जमिनीपासून ६ किमी जाडीपर्यंत वाहणारे समुद्री वारे आहेत. केरळकडे जमीन समांतर ताशी ३० ते ३५ किमी वाहणारे समुद्री वारे आहेत. आग्नेय अरबी समुद्रात व केरळ किनारपट्टी समोरील अलोट ढगांची दाटी झाली आहे.
सरासरी १ जूनला केरळात दाखल होणारा मान्सून साधारण १० जूनला मुंबईत सलामी देतो. तो यावर्षी ८ जूनला केरळात दाखल झाल्यामुळे १८ जूनला मुंबईत दाखल होण्याची अपेक्षा करता येईल. त्यातही कमी अधिक ४ दिवसांचा फरक जमेस धरला तर त्याचे आगमन मुंबईत १४ ते २२ जून दरम्यान केव्हाही होऊ शकते, असे वाटते. मुंबईत मान्सून सेट झाल्यावर सह्याद्री ओलांडून नंतर तो उर्वरित महाराष्ट्रात प्रवेश करू शकतो, असे खुळे म्हणाले.
''शुक्रवार दि. ९ जूनपासून त्यापुढील ३ दिवस म्हणजे सोमवार (दि. १२) पर्यंत मुंबईसह कोकण, खान्देशात नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पूर्व-मोसमी वळवाच्या पावसाची शक्यता जाणवते. दरम्यानच्या काळात मराठवाडा विदर्भात मात्र ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणीच किरकोळ पूर्व मोसमी वळवाच्या पावसाची शक्यता जाणवते. - माणिकराव खुळे, हवामानशास्त्राचे तज्ज्ञ''