वासुंदे गावात दिवसाढवळ्या सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 05:51 PM2024-12-10T17:51:01+5:302024-12-10T17:52:09+5:30
शेतकऱ्याच्या घरात दिवसाढवळ्या झाली चोरी; सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास
वासुंदे - वासुंदे (ता दौंड) येथील गावठाणात असणाऱ्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा अंदाजे २ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवार दि. ८ रोजी दुपारच्या सुमारास घडली असून याबाबतचा गुन्हा दौंड पोलीस स्टेशनला दाखल झाला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वासुंदे गावठाणात राहणारे अशोक भगवान बागल व त्यांच्या पत्नी उषा अशोक बागल हे पती-पत्नी घरातील काम उरकून दुपारी बारा वाजताचे सुमारास शेतातील काम करण्यासाठी शेतात गेले होते. शेतातील काम उरकल्यानंतर सायंकाळी सहा वाजताचे दरम्यान घरी आले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाट व शोकेस उघडे दिसून आले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले व त्यातील रोख रक्कम रुपये २५ हजार व ४ तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.
वासुंदे गावठाणातील वर्दळीच्या ठिकाणी ही दिवसा चोरी झाल्याने या परिसरात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. भर दिवसा झालेली ही चोरी पाळत राखून झाली असल्याची चर्चा स्थानिक नागरिक करत आहेत.
दरम्यान, अशोक बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दौड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरटय़ा विरुद्ध गु.र.नं 884/2024 भारतीय न्याय संहिता कलम 305,331(3) नुसार गुन्हा दाखल झाला असून दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गजानन शिंदे पुढील तपास करीत आहेत.