पुणे : सध्या सर्वत्र नवरात्रीचा आनंदोत्सव सुरू आहे. स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना बाहेर सर्वत्र प्रत्येक दिवशी विविध रंगांच्या साड्या, भोंडला, दांडिया अशा आनंदात मग्न आहेत. दुर्दैवाने आम्ही आमच्या कुटुंबीयांपासून दूर आहोत. तरीपण आज कारागृहात आयोजित भोंडला आणि दांडियाच्या निमित्ताने आम्हाला घरात असल्यासारखे वाटत आहे. आमच्या आयुष्यात हा आनंदाचा दिवस आम्ही कधीच विसरणार नाही अशा भावना व्यक्त करताना येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदीजन महिलांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.
येरवडा कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान पुणे आणि आदर्श मंडळ यांच्या वतीने बंदीजनांच्या पुनर्वसनासाठी गेली सहा वर्षे कार्यरत असणाऱ्या ‘प्रेरणा पथ’ या प्रकल्पांतर्गत महिला कारागृहातील भगिनींसाठी भोंडला आणि दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचा आनंद महिला कारागृहातील महिलांनी लुटला.
कोविडची नियमावली रद्द झाल्यानंतर दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. बंदीजन महिलांनी यामध्ये स्वत: गाणी गाऊन दांडिया नृत्य केले.
याप्रसंगी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, सामाजिक कार्यकर्ते नरेश मित्तल, संगीता मित्तल, विचारवंत कल्याणी संभूस, कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील, कारागृह प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य दौलतराव जाधव, चंद्रमणी इंदूरकर, तुरुंग अधिकारी एन.जे. खिल्लारे, तुरुंगाधिकारी अश्विनी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. बंदीजन समुपदेशनासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगत यापुढेही अशा प्रकारचे कार्यक्रम व्यापक स्वरूपात राबवण्यात येतील, असे स्वाती साठे यांनी सांगितले.