ऑक्टोबर हिटमुळे यंदाचा उकाडा अधिक दाहक होणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Published: October 15, 2023 05:32 PM2023-10-15T17:32:05+5:302023-10-15T17:32:29+5:30
उन्हाळयात पहाटेचे तापमान ३ ते ४ डिग्री तर दुपारचे तापमान २ डिग्रीने वाढण्याची शक्यता
पुणे: सध्या ऑक्टोबर हिटचा परिणाम हळूहळू राज्यात जाणवू लागला आहे. येत्या तीन दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. यंदाचा उन्हाळा अधिक दाहक होणार असून, पहाटेचे किमान तापमान ३ ते ४ डिग्रीने अधिक होण्याची शक्यता आहे. तर दुपारचे कमाल तापमानही २ डिग्रीने वाढेल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुले यांनी व्यक्त केला.
सध्या उत्तरेकडे राजस्थानच्या वायव्य टोकावर स्थित पश्चिमी झंजावात व दक्षिणेत तामिळनाडू स्थित चक्रीय वाऱ्यांची स्थिती अशा प्रणालीच्या एकत्रित परिणामामुळे येत्या ३ दिवसांत (१५ ते १७ ऑक्टोबर) महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देशमधी, नाशिक छ. संभाजीनगर, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच तुरळक ठिकाणीच केवळ अगदीच नगण्य किरकोळ पावसाची शक्यता जाणवते आहे. बुधवार दि.१८ ऑक्टोबरपासून पुन्हा ढगाळ वातावरण निवळून ऑक्टोबर हिटचा परिणाम महाराष्ट्रात पूर्ववत जाणवू लागेल. दरवर्षीपेक्षा ह्यावर्षीची ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक जाणवण्याची शक्यता असून, संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान २ डिग्रीने वाढणार आहे, तर पहाटेचे किमान तापमान ३ ते ४ डिग्रीने अधिक असण्याची शक्यता जाणवते. कोकण व मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा परिणाम अधिक असू शकतो, असा अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे.
''नैऋत्य मान्सून अद्यापही महाराष्ट्रातील वेंगुर्ल्यापर्यंत खिळलेलाच आहे. देशातून पूर्णपणे परतलेला नसून त्याला निरोप देण्यासाठी अजुनही वाट पहावी लागेल, असे वाटते. ईशान्य मान्सून तामिळनाडूमध्ये कदाचित २५ ऑक्टोबर दरम्यान सेट होण्याची शक्यता जाणवते. सध्या चक्रीवादळाचा काळ असून, त्यांची निर्मिती व त्यामुळे महाराष्ट्रात होऊ शकणाऱ्या पावसासंबंधीची माहिती त्या-त्या वेळेस अवगत केले जाईल. - माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ''