चोरट्यांना पकडण्यासाठी थरारनाट्य

By Admin | Published: September 26, 2015 02:39 AM2015-09-26T02:39:54+5:302015-09-26T02:39:54+5:30

चित्रपटात शोभेल असा थरार भादलवाडी (ता. इंदापूर) परिसरातील ग्रामस्थांनी अनुभवला. विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे.

Thorachers to catch the thieves | चोरट्यांना पकडण्यासाठी थरारनाट्य

चोरट्यांना पकडण्यासाठी थरारनाट्य

googlenewsNext

पळसदेव : चित्रपटात शोभेल असा थरार भादलवाडी (ता. इंदापूर) परिसरातील ग्रामस्थांनी अनुभवला. विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे. मध्यरात्रीपासून जवळपास १५ तास ‘अरेस्ट हिम’ची मोहीम राबली. भिगवण पोलीस, ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. २४) रात्री साडेदहा वाजल्यापासून चोरट्यांचा सलग अविश्रांत शोध घेतला. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.
पोलिसांच्या धाडसी मोहिमेत अनिल गुलाब मोरे (रा. मठ पिंपरी, ता. श्रीगोंदा), प्रकाश ऊर्फ अजय गुलाब माळी (वय १९, रा. ताकगिर्डी, ता. श्रीरामपूर, जि. नगर), दाऊद शाम शेख (वय २१, रा. चिखली कोरेगाव, जि. नगर), मोनिका भाऊसाहेब येवले (वय २०, रा. श्रीगोंदा साखर कारखान्याजवळ, श्रीगोंदा), मुरलीधर भाऊराव माळी (रा. मठपिंपरी) ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यापैकी मुरलीधर माळी याला जखमी अवस्थेत ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारेसह सुमो गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.
इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात विद्युत रोहित्र चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त आहे. परिसरातील जवळपास ४० विद्युत रोहित्र चोरीस गेले आहेत. त्यामुळे भिगवण पोलिसांसाठी विद्युत रोहित्राची चोरी डोकेदुखी बनली होती. या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चोरांची शोधमोहीम गतिमान केली होती. गुरुवारी मध्यरात्री भादलवाडी परिसरात विद्युत रोहित्र खाली पाडल्याची घटना शेतात पाणी देणाऱ्या शेतकऱ्याने पाहिली. त्यानंतर या शेतकऱ्याने प्रसंगावधान राखून पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक यादव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह भादलवाडी, डाळज गावाकडे धाव घेतली. पोलिसांच्या दिशेने भरधाव वेगाने जात असताना डाळज-भादलवााडी दरम्यान महामार्गावर पोलिसांना सुमो गाडी धीम्या गतीने जाताना आढळली. चाणक्ष पोलिसांनी कळस रस्त्यावर गाडी आडवी लावून सुमो गाडी अडवली. त्यातील एक महिला व एक पुरुष अशा दोघांना तत्काळ ताब्यात घेतले. एकूण सात जण असल्याची माहिती या दोघांकडून पोलिसांनी मिळविली. त्यासाठी ताब्यात घेतलेल्या दोघांच्या मोबाईलवरून इतर चोरट्यांना संपर्क साधला. त्यावर लपून बसलेल्या चोरट्यांनी, गाडीच्या काचा उघड्या ठेवून इंडिकेटर लावून पुढे निघा, असे सांगितले. त्यानंतर पोलीस सुमो गाडीत लपले. आरोपीचे कपडे घालून एक पोलीस कर्मचारी पुढे बसला. यादरम्यान सुमो गाडी जवळ आल्यावर चोरट्यांना पोलिसांची चाहूल लागली. त्यामुळे चोरटे तेथून फरार झाले.
त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने रात्री शोधमोहीम सुरू केली. रात्रभर परिसरातील ऊसपीक, झाडी, झुडपे आदी परिसर पोलिसांनी पिंजून काढला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी १ पर्यंत ५ जणांना पोलिसांनी पकडण्यात यश मिळविले.
पळालेले चोरटे नजीकच्या उसाच्या शेतात लपलेत असा अंदाज करून डाळज ग्रामस्थ, ग्रामसुरक्षा दल, युवा मंडळी या ‘अ‍ॅरेस्ट हिम’ (चोरांना पकडण्याची मोहीम) यात सहभागी झाले. जवळपास पंधरा तास सुरू असलेले थरारनाट्य संपुष्टात आले.
सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक दिलीप कोंडे - देशमुख, पोलीस कर्मचारी रमेश भोसले, शर्मा पवार, श्रीरंग शिंदे, इनकलाब पठाण, विलास मोरे, संजय काळभोर, गोरख पवार, केशव जगताप, महिला कर्मचारी के. डी. पोळ, सोनाली मोटे, सुधाकर जाधव, बापू हडागळे, अनिल सातपुते, धनंजय राऊत, नाना वीर, अभिजित एकसिंगे यांच्यासह अजिनाथ कुताळ, डी. एन. जगताप, डाळजचे पोलीस पाटील अवधूत जगताप आदींनी शोधमोहिमेत सहभाग घेतला.
सुरुवातीला सुमो गाडी (एमएच १२/अ‍ेव्ही ८९६३) संशयास्पद पोलिसांना दिसली. तत्काळ त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर सुमो पकडताच त्यामधील एक महिला व एक पुरुष अशा दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
त्यानंतर उर्वरित चोरट्यांना पकडण्यासाठी रात्रीपासून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आणखी एका चोरट्यास उसाच्या शेतातून खारतोडे वस्ती येथे पोलीस व ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर एक तासाच्या अवधीत आणखी एकाला भोसले यांच्या उसाच्या शेतात पकडले. त्यामुळे पोलीस व ग्रामस्थ यांची चोरट्यांना पकडण्याची शोधमोहीम अधिक सतर्क झाल्याने आणखी ग्रामस्थ गोळा होऊ लागले. त्यानंतर सकाळी ११च्या सुमारास आणखी एका चोरट्यास महामार्गालगतच्या उसाच्या शेतात पकडण्यात आले. मात्र, दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले. (वार्ताहर)

Web Title: Thorachers to catch the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.