पुणे : हिंदु संघटना देखील बाॅम्ब स्फाेट करु शकतात यावर काेणी हिंदु बाेलायला तयार नाही. बाॅम्ब स्फाेट करणाऱ्या हिंदु संघटना या समस्त हिंदुंच्या प्रतिनिधी नाहीत. एकमेकांबद्दलचा आकस जाेपर्यंत जाणार नाही ताेपर्यंत चर्चा हाेऊ शकणार नाही असे मत, माजी न्यायमुर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केले. 'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' या एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन आज बालगंधर्व रंगमंदिरात झाले त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, निवृत्त आय पी एस सुधाकर गायकवाड मंचावर उपस्थित हाेते. या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून विराेध करण्यात आला. निदर्शकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.
आपल्या मनाेगतात ठिपसे म्हणाले, मुश्रीफांनी त्यांच्या पुस्तकात जी मांडणी केली आहे, त्यावर चर्चा हाेण्याची गरज आहे. पुस्तक आक्षेपार्ह असेल किंवा भावना भडकावणारे असते तर सरकार पुस्तकावर बंदी घालू शकले असते. परंतु मुश्रीफ यांच्या पुस्तकावर काेणतीही कारवाई झाली नाही. मुश्रीफांनी त्यांच्या पुस्तकात काही तथ्य मांडली आहेत. त्यांनी पुस्तकात मांडलेल्या मुद्द्यांना काेणी खाेडून काढत नाही किंवा ते मान्यही करत नाही. जर एखाद्याला या पुस्तकातील मांडणी चुकीची आहे असे वाटत असेल तर त्याने ती खाेडून काढावी. परंतु असे हाेताना दिसत नाही. अनेकदा तपास यंत्रणांच्या चुकीच्या कारवाईमुळे एका विशिष्ट समाजावर संशय घेतला जाताे. पुस्तकात अनेक घटनांचा संदर्भ दिला आहे. अनेक ठिकाणी बाॅम्ब स्फाेट करणारे हिंदू असल्याचे समाेर आले आहे. परंतु हिंदु संघटना बाॅम्ब स्फाेट करु शकतात यावर काेणी बाेलायला तयार नाही. पुस्तकाच्या शिर्षकामुळे काहीसा गैरसमज हाेऊ शकताे. यातील ब्राह्मणवाद शब्द म्हणजे ब्राह्मण समाज असे हाेत नाही. ती एक प्रवृत्ती आहे. परंतु या शब्दाला पर्यायी शब्दाचा शाेध घेता येऊ शकेल. सध्याचं चित्र पाहिलं तर ब्राह्मणांपेक्षा इतर हिंदू जास्त कडवे असल्याचे जाणवते. इतर वर्गात असहिष्णुता जास्त दिसत आहे. ज्या हिंदु राष्ट्राची मागणी केली जाते त्या हिंदु राष्ट्राने सर्व समाज सुखी हाेणार नाही. रामराज्याच्या नावावर सध्या दहशतवाद पसरविण्यात येत आहे.
मुश्रीफ यांनी आपल्या मनाेगतात अनेक बाॅम्ब स्फाेटांंमध्ये मुस्लिमांना कसे राेवण्यात आले याबाबतची माहिती दिली. अनेक घटनांचा संदर्भही त्यांनी आपल्या मनाेगतात दिला.