‘त्या’ २४ गावांचा स्वतंत्र आराखडा करणार
By admin | Published: May 6, 2015 06:21 AM2015-05-06T06:21:22+5:302015-05-06T06:21:22+5:30
भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या २४ गावांचा गावनिहाय स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
पुणे : माळीण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या २४ गावांचा गावनिहाय स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
पूर नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीची बैठक राव यांच्या अध्यक्षतेखील मंगळारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश जाधव, सैन्यदलाचे कर्नल मराठे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले आदी अधिकारी उपस्थित होते. या वेळी राव यांनी सांगितले, की माळीण दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील गावांचे सर्वेक्षण केले. यामध्ये जिल्ह्यात २४ गावांमध्ये भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संभाव्य आपत्तीवर मात करण्यासाठी या गावांचा स्वतंत्र आराखडा करावा, याबाबत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात पुन्हा माळीणसारखी दुर्घटना झालीच, तर त्या गावातील लोकांना कोठे हलविणार, बचाव आणि मदत कार्य कसे राबविणार, याबाबत आराखडा तयार करताना प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
दरम्यान, याशिवाय पूरग्रस्त, प्रवण गावांचा आराखडा तयार करून आश्रयासाठी गावांतील शाळा, समाज मंदिरे आदी ठिकाणे निश्चित करून ठेवली जावीत, याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. तसेच, दोन्ही महापालिकांनादेखील त्यांचे आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
४पावसाळ्यापूर्वी रस्तेदुरुस्ती करावी, यंत्रसामग्री सज्ज ठेवा.
४मोबाईल रेंज पोहोचू शकत नाही, असे परिसर निश्चित करून तेथे पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.
४शहर आणि जिल्ह्यातील पूल व महत्त्वाच्या ठिकाणी पुराच्या पाण्याच्या पातळीचे रेखाकंन करावे.
४आरोग्य विभागाने रुग्णावहिकांची सेवा अव्याहत सुरू राहील,याची खात्री करावी.
४जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने औषधांचा पुरेसा साठा करावा.