पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे गंभीर होत चाललेला वाहतूक प्रश्न, अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, मावळ गोळीबारातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणे, दुष्काळ आणि मंदीच्या पार्श्वभूमीवर शहरात रोजगार हमीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्यात, याबाबत अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ विधानसभेतील आमदारांनी सांगितले.विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन बुधवारपासून मुंबईत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील आमदारांनी आपल्या मतदारसंघात निधी आणणे, प्रलंबित प्रश्न सोडविणे याविषयी लक्षवेधीच्या रूपाने आवाज उठविण्याचे नियोजन केले आहे. लक्षवेधी कोणत्या मांडायच्या, याविषयी तयारी केली आहे. त्यातून न्यायप्रविष्ट असणारा अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न मागील पानावरून पुढील पानावर आला आहे. सर्वच आमदारांनी यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. औद्योगिक मंदी, मावळ गोळीबार, पर्यटन विकास, क्रीडा धोरणाची अंमलबजावणी, पुणे-नाशिक रस्त्यासाठी तरतूद याविषयीचे प्रश्न अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)शहरातील वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा त्रास होतो. याविषयी विधानसभेत आवाज उठविणार आहे. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे, याविषयी सकारात्मक भूमिका सरकारची आहे. तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. राज्यात दुष्काळाची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे लोक शहराकडे येतात. त्याचबरोबर औद्योगिक मंदीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात रोजगार हमीची योजना आहे. - लक्ष्मण जगताप, चिंचवडपिंपरी-चिंचवड हद्द, तसेच पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, पाठपुरावा करण्याबरोबरच औद्योगिक परिसरातील झोपडपट्ट्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. तेथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवावी. पवना नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच ब्ल्यू लाइन आणि रेड लाइनबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, यासाठी पाठपुरावा करणार आहे. तसेच शहरात स्वंतत्र पोलीस आयुक्तालय सुरू करावे, याविषयी मागणी केली आहे.-गौतम चाबुकस्वार, पिंपरीअधिवेशनात विविध प्रश्न मांडणार असून, त्यापैकी पुणे-नाशिक रस्त्यासाठी निधी मिळावा, तसेच पिंपरी-चिंचवड परिसरातील अनधिकृत बांधकाम नियमितीकरणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, यासाठी पाठपुरावा करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी निर्णय घ्यावा, यासाठी विनंती करणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या पाच टक्के निधीची अंमलबजावणी केली जात नाही. त्याची अंमलबजावणी व्हावी. तसेच त्यातून खेळाडूंच्या विकासाच्या योजना राबवाव्यात, यासाठी आवाज उठविणार आहे. - महेश लांडगे, भोसरी
‘त्या’ बांधकामांचा प्रश्न सोडविणार
By admin | Published: March 09, 2016 12:39 AM