पुणे महापालिकेच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणामुळे हजारो तरुणांच्या हातांना मिळाले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:29 PM2017-12-15T13:29:36+5:302017-12-15T13:32:50+5:30

नोकऱ्या नाहीत, रोजगार नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी पुणे महापालिकेने तरुणांना उपलब्ध करुन दिल्यामुळे गेल्या सोळा वर्षात ३० हजारांपेक्षा अधिक तरुणांनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेतले आहे.

Thousands of young men got work; business-oriented training by Pune municipal | पुणे महापालिकेच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणामुळे हजारो तरुणांच्या हातांना मिळाले काम

पुणे महापालिकेच्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणामुळे हजारो तरुणांच्या हातांना मिळाले काम

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सहा महिने थांब होईल तुझे काम’ पालिकेच्या समाज विकास विभागाने केली नवीन म्हण रुढशेकडो तरुणांनी येथील प्रशिक्षणाच्या जोरावर उभे केले स्वत: चे व्यवसाय

लक्ष्मण मोरे
पुणे : नोकऱ्या नाहीत, रोजगार नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी पुणे महापालिकेने तरुणांना उपलब्ध करुन दिल्यामुळे गेल्या सोळा वर्षात ३० हजारांपेक्षा अधिक तरुणांनी व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेतले आहे. ‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ ही म्हण पालिकेच्या समाज विकास विभागाने बदलून दाखवित ‘सहा महिने थांब होईल तुझे काम’ या नवीन म्हण रुढ करुन दाखविली आहे. कष्टकरी आणि अल्प उत्पन्न गटातील शेकडो तरुणांनी येथील प्रशिक्षणाच्या जोरावर स्वत: चे व्यवसाय उभे केले आहेत, तर अनेकजण चांगल्या पगाराची नोकरी करीत आहेत. विशेष म्हणजे पालिकेच्या प्रमाणपत्रावर काहीजणांना विदेशात नोकरीची संधी मिळाली आहे. 
पुणे महापालिकेचे तत्कालीन सह आयुक्त अशोक कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागर वस्ती विकास योजनेचे काम सुरु करण्यात आले होते. शहरातील झोपडपट्ट्यांमधील तसेच वस्त्यांमधील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा, अल्पशिक्षित तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी १५ आॅगस्ट २००१ साली महापालिकेच्या शनिवार पेठेतील न. वि. गाडगीळ शाळेमध्ये व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले. वायरिंग, दुचाकी आणि चारचाकी दुरुस्ती, फोटोग्राफी, मोबाईल दुरुस्ती, ब्युटी पार्लर, स्पोकन इंग्लिश, संगणक हार्डवेअर, मशिन एम्ब्रॉयडरी, एमएससीआयटी, वेव्ह टॅली, टंकलेखन, फॅशन डिझायनिंग, एसी-फ्रिज दुरुस्ती, वेव्ह डीटीपी, वेव्ह सी बेसिक, वेव्ह वेब डिझायनिंग, चार चाकी ड्रायव्हिंग, माळीकाम, फर टॉईज, आॅटो कॅडचे प्रशिक्षण या तरुणांना द्यायला सुरुवात करण्यात आली. 
नागरवस्ती विकास योजनेच्या समन्वयिका वस्त्यांमध्ये जाऊन तरुणांना याबाबतची माहिती द्यायच्या. शाळांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसमोर पुन्हा परीक्षेला बसण्यासोबतच काम शोधण्याशिवाय पर्याय नसतो. उदरनिर्वाहाचे साधन शोधण्यापलिकडे काहीच पर्याय राहात नाही. त्यामुळे शाळा सोडलेल्या, नापास झालेल्या, शिक्षण अर्धवट राहीलेल्या तरुणांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिल्यास ते उपजिवीकेचे मार्ग शोधू शकतील असा हेतू या योजनेमागे होता. बाजार पेठेतील आणि उद्योग विश्वातील मागणी व गरज लक्षात घेऊन अल्प मुदतीचे आणि १०० टक्के प्रॅक्टीकलवर आधारित प्रशिक्षण येथे विद्यार्थ्यांना दिले जाते. कालांतराने अभ्यासक्रमांचे पुनर्विलोक होत असल्याने रोजगाराच्या दृष्टीने नवनविन प्रशिक्षण सुरु करण्यात येत आहेत. 
एस. एम. जोशी हॉलमध्ये १९९३-९४ पासून बेसिक संगणकाचे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात आले होते. त्यानंतर १९९६-९७ पासून सोमवार पेठेतील खडीचे मैदान येथे संगणक प्रशिक्षणासोबतच मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विषयांचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याने त्यांना बहुविध कौशल्य प्राप्त होतात. त्याचा उपयोग व्यवसायाच्यादृष्टीने होत आहे. स्पोकन इंग्लिश  कोर्स केलेल्या तरुणांना तर विविध मॉल, मल्टीप्लेक्स आणि खासगी कंपनीत चांगली नोकरी मिळाली आहे. 
तांत्रिक स्वरुपाचे प्रशिक्षण घेतलेल्या ८५ टक्के तरुणांनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले असून काही जणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही मिळाल्या आहेत. हा उपक्रम यशस्वी ठरल्यामुळे यशदा, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, केंद्र शासन, अन्य प्रशिक्षण केंद्रांचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी करुन माहिती घेतली आहे. या उपक्रमाची व्याप्ती वाढल्यामुळे सहकारनगर येथील वि. स. खांडेकर प्रशाला आणि हडपसर येथील पीएमटीच्या इमारतीमध्ये २००६ साली दोन प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आली. तर शिवाजीनगर, येरवडा आणि घोरपडे पेठेमध्ये खासगी संस्थांच्या मदतीने तीन केंद्र सुरु करण्यात आली आहेत. पालिकेच्या या उपक्रमामुळे हजारो हातांना काम मिळाले आहे. गुन्हेगारी आणि व्यसनाधिनतेकडे वळणा-यांना स्वयंरोजगाराकडे वळण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.
अल्ताफ सलिम सय्यद (वय २८) हे सिंहगड रस्त्यावर राहण्यास आहेत. त्यांचे शिक्षण अवघे दहावी. त्यांनी न. वि. गाडगीळ शाळेमधून दुचाकी दुरुस्तीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्रावरुन त्यांना नोकरी मिळाली. दुचाकी निरीक्षक म्हणून नोकरी करीत असताना आलेल्या अनुभवावरुन त्यांना दुसऱ्या बड्या कंपनीची आॅफर आली आहे. गॅरेजमध्ये ११ वर्ष काम केल्यानंतरही जो सन्मान मिळाला नाही, तो सन्मान त्यांना या प्रशिक्षणानंतर मिळाला आहे.

माझे शिक्षण अकरावीपर्यंत झाले आहे. मी दोन वर्षांपुर्वी ब्युटी पार्लरचा कोर्स केला. त्या अनुभवावर मी सिंहगड रस्त्यावर स्वत:चे ब्युटी पार्लर सुरु केले. सनसिटी रस्त्यावर माझे स्वत: चे पार्लर आहे. मला प्रशिक्षणाचा खुप फायदा झाला. महिला असून स्वत:च्या पायावर उभे राहण्याकरिता बळ मिळाले आहे. दिड वर्षांपासून माझा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरु आहे. 
 - मनिषा राहाणे, माणिकबाग, सिंहगड रोड


प्रशिक्षण केंद्रामध्ये तरुण आणि तरुणी प्रशिक्षण घेतात. त्यांना व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी त्याचा फायदा होतो आहे. गरिबीमधून आलेल्या या मुलांना रोजगार उपलब्ध झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे समाधान हे अधिक महत्त्वाचे आहे. पुणे महापालिकेने प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्यासाठी मोठी जबाबदारी पेललेली आहे. अधिकाधिक तरुणांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. शिक्षण नसल्यास कौशल्याधारीत प्रशिक्षण तरुणांना नक्की रोजगार देऊ शकेल. येथे प्रशिक्षण घेतलेले शेकडो तरुण आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. 
- असंग पाटील, सहायक सामाजिक विकास अधिकारी, समाज विकास विभाग

महिलांना स्वावलंबनाची संधी
गरजू महिलांना याठिकाणी प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची संधी आहे. फर टॉईज, ब्यूटी पार्लर, टंकलेखन, फॅशन डिझायनिंग या व्यवसायांच्या प्रशिक्षणाला महिला प्रवेश घेतातच. मात्र, दुचाकी दुरुस्ती, फोटोग्राफी अशा वेगळ्या व्यवसायांचेही प्रशिक्षण महिला घेऊ लागल्या आहेत. यामधून अनेक महिलांनी स्वत:चे ब्यूटी पार्लर सुरु केले आहे. तर अनेकींनी स्वत: चे घरगुती व्यवसाय सुरु केले आहेत.

पालिकेचा उपक्रम : गेल्या सोळा वर्षात ३० हजारांपेक्षा अधिक तरुणांना प्रशिक्षण
बिबवेवाडीतील जितेंद्र मन्हेरे या तरुणाचे वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षापर्यंत शिक्षण झाले. घरच्या हलाखिच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता आले नाही. २००८ साली त्यांनी प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेतला. प्रवेशासाठी भरायला जवळ ५०० रुपयेही नव्हते. मित्राकडून उसणे घेऊन त्यांनी पैसे भरले. मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. त्यामधून चांगले पैसे मिळू लागले. आज त्यांच्याकडे आणखी एक तरुण नोकरी करतो. स्वत:च्या रोजगारासोबतच आणखी एकाला रोजगार देण्यात मन्हेरे यशस्वी झाले आहेत. आईवडील आणि कुटुंबीयांना आपला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Thousands of young men got work; business-oriented training by Pune municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.