पुणे : पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी एका भंगार व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातातील धारदार हत्यार हवेत फिरवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी एकावर हडपसरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (२५ नोव्हेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास हडपसर परिसरातील लेन नं. ५ येथील गजानन महाराज मंदिराजवळ घडला.
याप्रकरणी राम लौटन यादव (४५, रा. लेन नं. ५, गजानन महाराज मंदिराजवळ, हडपसर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर, अजय मौजन याच्यावर आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राम यादव यांच्या भाऊ आणि आरोपी मौजन यांचे भांडण झाले होते. यानंतर अजय मौजन याने दुकानात येऊन यादव यांच्या भावावर धारदार हत्याराने वार करुन जबरदस्तीने पैसे काढून नेले होते. हा प्रकार सप्टेंबर मध्ये घडला होता. याप्रकरणी आरोपी अजय मौजन याच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी यादव हे त्यांच्या लक्ष्मी रद्दी बुक डेपो या दुकानात गोळा झालेले भंगार जमा करत होते. त्यावेळी आरोपी जबरदस्तीने दुकानात घुसला, त्याने हडपसर पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घे नाहीतर धारदार हत्याराने जीवे मारून टाकीन अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने हातातील धारदार हत्यार हवेत फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कामठे करत आहेत.