विमाननगर : लोहगाव -वाघोली रोड येथील अॅमेझॉन गोडाऊनवर सशस्त्र दरोडा टाकून रोख रकमेसह सीसीटीव्ही डीव्हीआर व मोबाईलची चोरी करणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी शिताफीने अटक केली. सत्यवान उर्फ अप्पा श्रीमंत घाडगे (वय २२, रा. वाघेश्वरनगर वाघोली), निशांत अनिल ननावरे (वय २४ रा. मोहेमदवाडी हडपसर), आकाश अशोक राठोड (वय २३, रा.वागेश्वर नगर-वाघोली) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून, १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत .
पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार: या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या तीनही आरोपींना विमानतळ पोलिसांनी शिताफिने अटक केली. अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गुन्हे निरीक्षक रमेश साळी, तपासपथकाचे प्रमुख उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, पोलीस कर्मचारी अशोक आटोळे, पुष्पेंद्र चव्हाण, विश्वनाथ घोणे, संजय आढारी यांच्या पथकाने या दरोड्याचा तपास लावला.लोहगाव, वाघोली रोड येथे २६ आॅक्टोबर रोजी पहाटे अॅमेझॉन गोडाऊनवर सशस्त्र चोरट्यांनी दरोडा टाकला होता. या चोरट्यांनी सशस्त्र हत्यारांनी मारहाण करून तेथील तीन लाख अडतीस हजार रुपये रक्कम दोन मोबाईल व सीसीटीव्हीचा डीव्हीआर शिताफीने चोरून नेला होता. या गुन्ह्यातील आरोपींकडून इतरही आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.